पुणे-सातारा महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी; बंदोबस्तात पोलीस व्यस्त

पुणे - सातारा, खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब लागलेल्या रांगा
पुणे - सातारा, खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनाच्या लांबच लांब लागलेल्या रांगा

नसरापूर: पुढारी वृत्तसेवा : शासकीय सुट्ट्या जाहीर झाल्याने पुणे, मुंबईहून मोठ्या प्रमाणात चाकरमानी बाहेर पडल्याने पुणे – सातारा महामार्गावर आज (दि.१) दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामीण पोलीस दल नसरापूर येथे होणाऱ्या महायुतीच्या सभेच्या ठिकाणी दिवसभर ठाण मांडून आहेत.

शालेय सुट्टी पडल्याने आणि महाराष्ट्र व कामगार दिनाची सुट्टी असल्याने बुधवारी (दि. १ मे) पुणे – सातारा महामार्गावर सकाळपासून साताराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. तर दुसरीकडे महायुतीच्या होणाऱ्या सभेला ग्रामीण दलातील पोलीस मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते. याबाबत जनमानसातून उलट सुलट चर्चा झडत होती. मात्र, नसरापूर येथे होणाऱ्या माहितीच्या सभेला व्हीआयपी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर दुपारनंतर ठिकठिकाणी बंदोबस्त पॉइंटवर कर्मचारी तैनात केले होते. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा नसरापूर येथे पुणे – सातारा महामार्गालगत चेलाडी फाटा परिसरात आज सायंकाळी पार पडणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे शहर, मुळशी, शिरवळ, पुरंदर, सासवड, बारामती, भोर तसेच वेल्हामधून महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार नागरिक मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहत असून सभा संपल्यानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news