पिंपरी : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॉय शेअरींग बँक

पिंपरी : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॉय शेअरींग बँक
Published on
Updated on

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेळणी हा मुलांचा आवडता छंद असतो. तर स्वत:कडे सर्व प्रकारची खेळणी असावी, असे प्रत्येक लहान मुलाला वाटते. खेळण्यातून नावीन्यपूर्णतेचा, सृजनशीलतेचा विकास व्हावा, यासाठी बाजारात कितीतरी प्रकारची खेळणी मिळतात. मात्र, इतक्या प्रकारची खेळणी आणायची तरी कुठून? मुलांना वेगवेगळ्या खूप सार्‍या खेळण्यांचा अनुभव मिळावा, यासाठी सोनवणे वस्तीतील मनपा शाळेतील योगीता सोनवणे या शिक्षिकेने टॉय शेअरींग बँक हा उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, याबाबत योगीता सोनवणे यांनी सांगितले की, वरिष्ठ वेतन श्रेणी ऑनलाइन ट्रेनिंग झाले होते, त्यात वर्गातील प्ले एरियासंदर्भात ऐकले तेव्हा ती संकल्पना विशेष आवडली होती. एका रविवारी वर्तमान पत्रातील बँकसंदर्भात कसलेतरी पॅम्प्लेट होते. खेळणी आणि बँक पॅम्प्लेट दोन्ही डोळ्यासमोर होते. अचानक त्या क्षणी खेळण्यांची बँक असायला हवी असे वाटले. यातूनच टॉय बँक कशी बरं करता येईल? याचा विचार सुरू झाला आणि यातूनच टॉय शेअरींग हा उपक्रम सुरू झाला.

असा चालतो उपक्रम

वर्गाचा पट 44 होता, 44 खेळण्यांचे सेट जमा केले. सर्व खेळणी वर्गात नेली आणि मांडली. समोरील खेळणीपैकी आवडलेले खेळणे घरी घेऊन जायचे. दोन किंवा तीन दिवस खेळायचे व सांगितलेल्या दिवशी परत आणायचे. त्यादिवशी सर्वांनी आपापली खेळणी परत समोर मांडायची व पुन्हा वेगळे खेळणे निवडायचे. पुन्हा दोन-तीन दिवसांनी जमा करायचे. बदलून नवे घायचे.

उपक्रमाचे नियम

प्रत्येकवेळी नवीन-वेगळ्या प्रकारचे खेळणे निवडावे. खेळणी हरवू नये, हरवल्यास परत दुसरे खेळणे मिळण्याची संधी मिळणार नाही. छान, नियमित अभ्यास करणारे, इतरांना त्रास न देणार्‍या मुलांना खेळणी निवडण्याची सुरुवातीला संधी. त्यामुळे ज्याला सुरुवातीला संधी त्याच्या आवडीचे खेळणे मिळण्याची खात्री. तुमच्या आवडीचे खेळणे कदाचित तुम्हाला या वेळी मिळणार नाही, मात्र जोपर्यंत वाट्याला येत नाही, तोपर्यंत इतर खेळणीही खेळायची.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये होतोय हा बदल

मुलांना वेगवेगळ्या खूप सार्‍या खेळण्यांचा अनुभव मिळतो. स्वत:ला मिळालेली खेळणी जबाबदारीपूर्वक सांभाळावी लागतात. (आपली वस्तू जपून वापरणे, जपून ठेवणे, तिची काळजी घेणे) यातूनच पुढे सार्वजनिक वस्तूंचा वापर जबाबदारीने काळजीपूर्वक करावा. तसे केले तरच आपल्याला इतर सार्वजनिक सुविधांचा लाभ चांगल्याप्रकारे मिळू शकतो, अशी शिकवण स्वतःच्या कृतीतून अनुभवता येते. आपल्याला आवडणारी खेळणी-गोष्टी शेअर करता यावी, प्रसंगी आपल्या आवडीची गोष्ट मिळण्यासाठी वाट पाहण्याची मनाची तयारी होते.

पहिल्यांदा खेळणी दिल्यानंतर तीन दिवसांनी खेळणी परत येतील का? तुटली, हरवली तर नसतील? अशा शंकासोबत उत्सुकता होती. पण सगळ्या मुलांनी खेळणी व्यवस्थित खेळून परत आणली. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून आपापसांत बदलून मुलं खेळणी खेळत आहेत. आता मात्र खेळणी त्यांना देऊन टाकली आहेत. कारण खेळण्यांचा दुसरा उपक्रम सुरू करायचा मनात आहे. अशा प्रकारे अतिशय छान असा अनुभव या उपक्रमातून मुलांना आणि मला मिळाला आहे.

– योगिता सोनवणे, शिक्षिका,
सोनवणे वस्ती मनपा शाळा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news