पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातांना लागणार ब्रेक  | पुढारी

पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातांना लागणार ब्रेक 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातांना आता आगामी काळात ब्रेक लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर नुकताच आरटीओकडून या मार्गाचा एकत्रित सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर उपाययोजना होणार आहेत. रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून आरटीओ अधिकार्‍यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली. या वेळी आरटीओ अधिकार्‍यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी (एनएचएआय), मनपा अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी, स्थानिक नागरिकदेखील उपस्थित होते.

त्यांच्या मदतीने पुणे हद्दीत असलेल्या पुणे-सोलापूर रस्त्यावर पाहणी करण्यात आली. त्या वेळी या मार्गावर अपघातास कारणीभूत ठरणार्‍या सर्व गोष्टींची नोंद करून, त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर करण्यात आला आहे. अहवालाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी देशमुख यांनी संबंधित विभागाला (एनएचएआय, पीएमआरडीए, बांधकाम विभाग, मनपा) या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या उपाययोजना झाल्यावर या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र कमी होणार आहेत, यामुळे अपघात कमी होतील, असा विश्वास आरटीओ अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून आरटीओकडून हा सर्व्हे करण्यात आला आहे. त्याचा अहवाल सादर करण्यात आला असून, लवकरच या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर संबंधित विभागांमार्फत उपाययोजना केल्या जातील, यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल. 
                           – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे  

हेही वाचा :

Uddhav Thackeray : कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा जिंकाच

Rain Update : राज्यात आजपासून पुन्हा एकदा मुसळधार

Back to top button