Pune News : संघर्षातून तो बनला वनअधिकारी; विशाल हरिहरची संघर्षमय कहाणी

Pune News : संघर्षातून तो बनला वनअधिकारी; विशाल हरिहरची संघर्षमय कहाणी
Published on
Updated on

कार्ला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : एका ध्येयाने पछाडले की, संघर्षाची वाट बिकट असली तरी ती वाट तुडवून यशाची गवसणी घालायला अनेकांना आवडते, अशाच संघर्षशील व ध्येयाने पछाडलेल्या एका मुलाने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विसापूर पायथ्याशी असणार्‍या पाटण गावातील विशाल सुनील हरिहर असे त्या मुलाचे नाव आहे. त्याची आई भाजी विक्रेती असून वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. त्याला हे यश मिळवण्यासाठी खूप मोठ्या संघर्षातून मार्ग काढावा लागला आहे.

मळवली गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण, तर माध्यमिक शिक्षण भाजे शांतीदेवी गुप्ता विद्यालय व उच्च माध्यमिक शिक्षण व्हीपीएस लोणावळा येथे झाले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने यश मिळवले. आई वडिलांच्या कष्टाचे चिज विशालने केले.

वडील ट्रक ड्रायव्हर तर आईने गावागावात भाजी विकून विशालचे शिक्षण पूर्ण केले. तर आजी आजोबांबरोबर शेतीची अवजारे बनवण्यातदेखील तो मदत करतो. विशेष म्हणजे विशालने दहावी व बारावी परीक्षेतदेखील शाळेत प्रथम क्रमांक मिळवला होता.
त्याच्या दोन भावांनी त्याच्या शिक्षणाला मदत केली. इंजिनिअरिंग शिक्षण झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो अनेक स्पर्धा परीक्षा देत होता. थोड्या गुणांनी त्याचे यश त्याला हुलकावणी देत होते. त्याच्या मित्रांनीदेखील त्याला प्रोत्साहन देत त्याची ऊर्जा वाढवत राहिले. सात वर्षांच्या अखंड व खडतर प्रयत्नात त्याने यश मिळवले.त्याच्या यशाबद्दल अनेकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news