पुणे : न्यायालयीन आदेशाची प्रत फाडणाऱ्या तिघा आरोपींवर गुन्हा

file photo
file photo

पाटस : पुढारी वृत्तसेवा

सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हातातील न्यायालयीन आदेशाची प्रत हिसकावून घेत फाडून टाकणाऱ्या व आत्महत्येची धमकी देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ७ च्या सुमारास पाटस पोलिस चौकीत आरोपी गणेश किसन कोकरे, प्रशांत धुळा कोकरे, किसन साहेबराव कोकरे (सर्व रा. पाटस मोटेवाडा, ता. दौंड) यांची पोलिस चौकशी करीत होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाबळे हे आरोपींना तुमच्याविरुद्ध दौंड न्यायालयाने निकाल दिलेला आहे, अशी माहिती देत होते. ते आरोपींना छायांकित प्रत दाखवत असताना गणेश कोकरे याने त्यांच्या हातातील छायांकित प्रत हिसकावून घेत फाडून टाकली. तर प्रशांत कोकरे याने त्याचे डोके ठाणे अंमलदाराच्या टेबलवर जोरात आपटले. वाबळे यांनी त्यांना अडविले असता त्याने पुन्हा टेबलावर जोरात डोके आपटून आत्महत्येची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केली.

किसन कोकरे याने टेबलवरील कागदपत्रे उचलून फेकून दिली. याप्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा तसेच आत्महत्येची धमकी दिल्याचा गुन्हा गणेश कोकरे, प्रशांत कोकरे, किसन कोकरे यांच्यावर दाखल झाला आहे. पोलिस हवालदार संदीप कदम यांनी याबाबत तक्रार दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news