कोल्हापूर : विधवा प्रथा बंदचा क्रांतिकारी पॅटर्न राज्‍यात राबविणार : हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : विधवा प्रथा बंदचा क्रांतिकारी पॅटर्न राज्‍यात राबविणार : हसन मुश्रीफ

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा: हेरवाड ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढण्‍यात येईल. हा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार येतील, अशी माहिती  ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुंबई मंत्रालय येथे आज गुरुवारी (दि.१२) हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर व खासदार सुप्रिया सुळे आदी प्रमुख उपस्थित होते.

४ मे रोजी झालेल्या गावसभेत हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला. या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या निर्णयाची दखल घेऊन हेरवाडचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप मारली. इतकेच नव्हे तर डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या निर्णयाबद्दल हेरवाड गावाला ५० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तउपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही महिलांच्या विकासासाठी ११ लाखांचा निधी जाहीर केला आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आज हेरवाड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे बोलवून त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, विधवा महिला संदर्भात असलेले धोरण अजून अर्धवट आहे, त्यामध्ये बदल करून विधवा महिला प्रथा बंदसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या वेळी हसन मुश्रीफ म्हणाले, हेरवाड गावाने घेतलेला  निर्णय हा खरोखरच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना न्याय मिळणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी सचिवांना तात्काळ परिपत्रक काढायचा आदेश दिला आहे. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button