पुण्यात तीन लाख नवमतदार पात्र; मतदार नोंदणी केवळ 65 हजार

पुण्यात तीन लाख नवमतदार पात्र; मतदार नोंदणी केवळ 65 हजार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील लोकसंख्या सुमारे 3 लाख 59 हजार 839 असून, या वयोगटातील मतदारसंख्या केवळ 65 हजार 851 आहे. म्हणजेच 2 लाख 93 हजार 988 युवक मतदार होण्यासाठी पात्र होऊ शकतात. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सक्त सूचना करून मतदार नोंदणीवर भर देण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 'विशेष नवमतदार नोंदणी अभियान' राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

पुणे शहरात राज्याच्या विविध भागांतून आलेले विद्यार्थी शिक्षणासाठी 3 ते 5 वर्षे वास्तव्य करीत असल्याने त्यांची मतदार नोंदणी पुण्यात किंवा त्यांच्या मूळगावी होणे आवश्यक आहे. जिल्ह्याची अंतिम मतदारयादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नागरिकांना वर्षातून चार वेळा म्हणजेच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे.

याबाबत महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना बैठकीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असून, समन्वयक अधिकारी आणि दोन प्रतिनिधींना ऑनलाईन मतदार नोंदणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. विशेष मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी 14 सप्टेंबर रोजी महाविद्यालयांना भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वत: महाविद्यालयांना पत्र लिहून यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती दिली असून, त्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

मतदार नोंदणीसाठी ही वेबसाईट

मतदार नोंदणी अर्ज https:// voters. eci. gov. in या वेबसाईटवर किंवा वोटर हेल्पलाईन अ‍ॅपद्वारे ऑनलाईन भरता येतात.

ही कागदपत्रे आवश्यक

मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोंदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी, तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित केलेले 10 वी किंवा 12 वी चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news