पठ्ठ्याने बायकोला गिफ्ट केला चंद्रावरील भूखंड | पुढारी

पठ्ठ्याने बायकोला गिफ्ट केला चंद्रावरील भूखंड

कोलकाता : प्रिये, मी तुझ्यासाठी आकाशातील चंद्रसुद्धा आणू शकतो, अशा आणाभाका घेतल्याचे द़ृश्य आपण चित्रपटात पाहतो. परिकथांमध्येही असे उल्लेख आपल्या वाचनात येतात. पश्चिम बंगालमधील संजय महातो यांनी ही कल्पना वास्तवात उतरवली आहे. त्यांनी पत्नी अनुमिका हिला लग्नाच्या पहिल्या वाढदिनी चंद्रावरील एक एकर जमीन गिफ्ट म्हणून दिली आहे.

एका संकेतस्थळावर दहा हजार रुपये भरून तसे प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले आहे. हेच प्रमाणपत्र त्यांनी बायकोच्या हाती सोपवले, तेव्हा त्यांना कृतकृत्य झाले. मी लग्नाआधी माझ्या पत्नीला तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचे वचन दिले होते. ते वास्तवात उतरवल्याचा आनंद वेगळाच असल्याचे महातो यांनी म्हटले आहे. आता घरापुढील अंगणात बसून चंद्राला न्याहाळताना आम्हाला अभिमान वाटेल की, आमच्या मालकीची जमीन तिथे आहे. वास्तवात आम्ही तिथपर्यंत जाणार नसलो, तरी ही भावनाच सुखावणारी आहे, असे या दाम्पत्याने म्हटले आहे.

Back to top button