

पुणे : पुढारी वृत्तसेवा
ई-एसटीच्या आतमध्ये कॅमेरे… बाहेर कॅमेरे… त्याच्या निरीक्षणासाठी चालकाच्या आसनाशेजारी छोटा एलईडी… संपूर्ण वातानुकूलित… एका चार्जमध्ये 200 ते 250 किमी धावणार, अशी अत्याधुनिक सुविधा असलेली इलेक्ट्रिक बस पुण्याच्या विभागीय कार्यालयात धावण्यासाठी सज्ज असून, तिच्यासाठी येथेच उभारण्यात येत असलेल्या चार्जिंग स्टेशनचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे.
पीएमपीप्रमाणेच आता एसटीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक गाड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 2 इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, एक जूनपासून एसटीच्या या गाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
राज्यात पहिली एसटी बस पुणे-नगरदरम्यान धावली होती. त्यानंतर आता पुन्हा एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस येथूनच धावणार आहे. तारीख सुद्धा सारखीच असून, फक्त सालात बदल होणार आहे. त्यामुळे 1948 साली धावलेली पहिली एसटी ते 2022 मध्ये धावणारी पहिली इलेक्ट्रिक एसटी हा प्रवास खरोखरंच वाखाणण्याजोगा आहे.