एनसीबीच्या आरोपपत्रातून आर्यन खान याला वगळले | पुढारी

एनसीबीच्या आरोपपत्रातून आर्यन खान याला वगळले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एनसीबीच्या विशेष पथकाने केलेल्या तपासात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट मिळाल्याने त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले असून अन्य 14 जणांविरोधात 6000 पानांचे आरोपपत्र सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले.

मुंबईहून गोव्याला जाणार्‍या कॉर्डिलिया या आलिशान क्रूझवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करत एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि गोमितला नुपूर, मोहक आणि मुनमुनला कॉर्डिलिया क्रूझवरून ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी एनसीबीने 20 जणांना अटक केली.

त्यांनतर त्यांच्या विरोधात सुरुवातीला 90 आणि त्यानंतर आणखी 60 दिवसांची न्यायालयाकडून आरोपपत्र दाखल करण्यास मुदत वाढ घेतल्यानंतर एनसीबीने शुक्रवारी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात आर्यन खान, अविन साहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल, यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे मान्य करत एनसीबीने त्यांची नावे वगळण्यात आल्याचे न्यायालयात सांगितले.त्यामुळे एनसीबीच्या एकूण कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय?

एनसीबीफने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी मुंबईहून गोव्याला जाणार्‍या कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या व 1 लाख 33 हजार रुपये जप्त करण्यात आले. या कारवाईत एनसीबीने बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते.

एनसीबीने पुढे तपास करत या तिघांसह विक्रांत छोकर, मोहक जैसवाल, इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओम अशा एकूण 20 जणांना अटक केली होती.

एनसीबीचे कुठे चुकले? 5 मुद्दे

कुख्यात डॉन दाऊद गँगशी व्यवहार केल्याप्रकरणात सध्या तुरुंगात असलेले बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी हे प्रकरण म्हणजे वानखेडे यांचा फर्जीवाडा असल्याचे म्हटले होते. त्यांच्या आरोपानंतर या प्रकरणाचा तपास वानखेडेंकडून काढून घेण्यात आला, वानखेडेंची एनसीबीतून बदलीही झाली. चौकशी पथकाचे प्रमुख आणि एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांनी आर्यनला क्‍लीन चिट कोणत्या मुद्द्यांवर मिळाली ते स्पष्ट केले.

1. आर्यन खानवर ठेवलेले कोणतेही आरोप वानखेडे आणि त्यांचे पथक सिद्ध करू शकले नाहीत. या प्रकरणातील 14 आरोपींपैकी एक असलेला आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याने अधिकार्‍यांना सांगितले होते की, आर्यनने जहाजावर दाखल होण्यापूर्वी आम्हा सर्वांना ड्रग्ज आणू नका, असे निक्षून सांगितले होते. आर्यनवरचा ड्रग्ज बाळगल्याचा आरोप टिकला नाही. त्याचप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया न पाळताच आर्यनचा फोन एनसीबीच्या अधिकार्‍यांना उघडला.

2. आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेत तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग असल्याचे वानखेडे टीमने म्हटले होते. ड्रग्ज खरेदीसाठी पैसे देण्याचा उल्‍लेखही या चॅटमध्ये असल्याचा दावा वानखेडेंनी केला होता. विशेष चौकशी पथकाच्या तपासात मात्र या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये ड्रग्ज प्रकरणाचा कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. शिवाय व्हॉट्स अ‍ॅप चॅट हा प्राथमिक पुरावा असू शकत नाही, असे न्यायालयानेही सांगितले.

3. वानखेडे टीमने केलेल्या तपासात तीन घोडचुका आढळल्या. एक म्हणजे कॉर्डिलिया क्रूझवर धाड टाकतानाचे कोणतेही रेकॉर्डिंग या टीमने केले नाही. दुसरे म्हणजे आर्यन खानसह कुणाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही आणि तिसरी चूक म्हणजे कायदेशीर प्रक्रिया न पाळता मोबाईल फोन जप्‍त करण्यात आलेे.

4. वानखेडेंच्या टीमने साक्षीदार म्हणून आपली सही कोर्‍या कागदावर घेतली, असे प्रभाकर साईलने सांगितले. कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आरोप करत सरसकट अटकसत्र राबवले गेल्याचेही विशेष चौकशी पथकाला आढळून आले.

5. कॉर्डिलिया क्रूझवर पार्टीचे आयोजन करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. त्यापैकी कुणालाही ड्रग्जची माहिती नव्हती. क्रूझवर येणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्याची जबाबदारी किंवा ते ड्रग्ज सेवन करणार नाहीत, याची खातरजमा करण्याची जबाबदारी या आयोजकांवर नव्हती.

आर्यन खानचे ते 25 दिवस

* 2 ऑक्टोबरला मुंबई क्रूझ टर्मिनलवरील कॉर्डिलिया क्रूझवर छापा
* 3 ऑक्टोबरला आर्यनला अटक आणि एक दिवसाची एनसीबी कोठडी
* 4 ऑक्टोबर अधिक तपासासाठी एनसीबी कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ
* 7 ऑक्टोबरला आर्यनची न्यायालयीन कोठडीत रवानगी, जामिनासाठी अर्ज
* आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोना नियमावलीनुसार आठवडाभरासाठी विलगीकरण कक्षात
* 8 ऑक्टोबरला जामिनावर सुनावणी, एनसीबीकडून आक्षेप

न्यायालयाने जामीन फेटाळला

* 11 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामिनासाठी अर्ज
* 13 ऑक्टोबरला जामिनावर सुनावणी, एनसीबीकडून तीव्र विरोध
* 14 ऑक्टोबरला न्या. व्ही.व्ही पाटील यांनी निकाल राखून ठेवला.
* 20 ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
* 26 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.
* 27 ऑक्टोबरला आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.
* 28 ऑक्टोबरला अखेर हायकोर्टाने जामीन मंजूर केला

Back to top button