मान्सून उद्या केरळमध्ये, 5 जूनला महाराष्ट्रात | पुढारी

मान्सून उद्या केरळमध्ये, 5 जूनला महाराष्ट्रात

मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : वार्‍याची योग्य दिशा आणि अनुकूल स्थितीच्या परिणामामुळे मान्सून पुढे सरकण्यास वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत (30 मे) मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वाढली असल्याचे शुक्रवारी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिल्यास महाराष्ट्रात 5 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागासह अंदमान समुद्र, तसेच अंदमान-निकोबार बेटांवर मागील पाच ते सहा दिवसांपासून थबकलेल्या मान्सूनला पुढे वाटचाल करण्यास गुरुवारपासून अनुकूल स्थिती तयार झाली. कमी दाबाचे वाढलेले पट्टे, तसेच वार्‍याची योग्य दिशा आणि बाष्प यामुळे थांबलेला मान्सून पुढे सरकण्यास सुरुवात झाली.

शुक्रवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीप बेटांबरोबर कोमोरीनाचा भाग व्यापला. त्यामुळे या भागात सध्या जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मान्सून पुढे सरकण्यास आणखी चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे येत्य दोन ते तीन दिवसांत (30 मे) मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button