

पुणे: पूर्वी कसं रोज दोन ते तीन नाटकांच्या जाहिरातींचे फलक तयार करायचो. पण, आता शनिवारी अन् रविवारीच काम मिळतं... बायको गृहिणी आहे. मुलगा ऑफिस बॉय म्हणून एका ठिकाणी नोकरी करता. पण, त्याला जेमतेम 10 ते 12 हजार रुपये मिळतात अन् मला मिळणारं मानधनही तितकचं... मग, महिन्याला मिळणाऱ्या 20 ते 22 हजारांत तिघाचं जगणं कसं भागवायचं तुम्ही सांगा. काटकसर करावी लागते.
फ्लेक्स युगामुळे कामं कमी, मानधन कमी झालंय... काय करणार? दुसरं काम करणं या वयात मला शक्य नाही, अनेक संकटं आहेत. पण, कसं तरी आयुष्य आम्ही चालवतोय, अशी कहाणी आहे नाटकांचे जाहिरात फलक तयार करणाऱ्या बाळकृष्ण कलाल यांची. ज्या निष्ठेने नाट्यकलेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्याच नाट्यकलेतून त्यांना मिळणारे मानधन आज कमी झाले आहे. त्यामुळेच फक्त बाळकृष्ण कलालच नव्हे तर त्यांच्यासारखे कित्येक पडद्यामागील कलाकार आर्थिक संकटात आहे.
सेट उभारणारे, प्रकाशयोजना करणारे, साऊंड ऑपरेटर, रंगभूषाकार, नाटकांच्या जाहिरातींसाठी फलक तयार करणारे, अशा सर्वांच्या कष्टावरच नाटक उभं राहतं. मात्र, काळाच्या ओघात या पडद्यामागील कलाकारांच्या वाट्याला कामाची कमतरता आणि अपुरे मानधन, असे दुहेरी संकट आले आहे. पूर्वी आठवडाभर चालणारे नाट्यप्रयोग आता शुक्रवार, शनिवार आणि रविवारपुरते मर्यादित झाले आहेत.
परिणामी महिन्याला मिळणाऱ्या कामात मोठी घट झाली आहे. पुण्यात सुमारे 30 ते 40 पडद्यामागील कलाकार कार्यरत असून, प्रत्येक नाट्यप्रयोगामागे त्यांना सध्या फक्त 700 ते 1000 रुपये मानधन मिळत आहे. आमच्या कलेला योग्य मानधन आणि सातत्यपूर्ण कामाच्या संधी मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी कलाकारांकडून केली जात आहे. गेल्या 43 वर्षांपासून सेट डिझाईनचे काम करणारे दत्तात्रय शिंदे सांगतात, या कामाने कुटुंबाला आधार दिला.
पूर्वी खूप काम मिळायचे. कुटुंबाचा खर्च भागायचा. पण, आता हाताला कामं कमी आहेत. मिळणाऱ्या मानधनात महिन्याचा खर्च भागत नाही. दुसरे काम शोधावे लागते; मात्र, तिथेही कमी काम अशी स्थिती आहे. आज काम आहे, उद्या नाही, अशी चिंता वाटते. ही माझीच कहाणी नाहीतर प्रत्येक पडद्यामागील कलाकाराची आहे.
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याची चर्चा ऐकली. या नाट्यगृहाशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत. येथेच सर्वाधिक प्रयोग होतात आणि आम्हाला काम मिळते. कृपया हे नाट्यगृह पाडू नये. नेपथ्याचे काम करणाऱ्या सचिन फुलपगार यांनी आजच्या स्थितीत काम कमी आणि मानधनही कमी अशी परिस्थिती आहे, तडजोड करतच घरखर्च भागवावा लागतो.
माझ्यासारखे कित्येक कलाकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे सांगितले. प्रकाशयोजना आणि साऊंड ऑपरेटर म्हणून 45 वर्षांचा अनुभव असलेले अरुण पोमण म्हणाले, ‘पूर्वी महिन्याला 20 ते 25 कामे मिळायची. आता ती चार ते पाचवर आली आहेत’. पुण्यातील नाट्यनिर्मिती कमी झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग जास्त होत असले, तरी त्यात स्थानिक पडद्यामागील कलाकारांना संधी मिळेलच असे नाही. त्यामुळे अनुभवी कलाकारांनाही कामासाठी प्रतीक्षा करावी लागते.