परदेशातही लावले महिला ढोल-ताशा पथकाने वेड!

परदेशातही लावले महिला ढोल-ताशा पथकाने वेड!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशा पथकांनी वैशिष्ट्यपूर्ण वादनाने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडे आपला निनाद पोहोचवला आहे…अनेक देशांमध्ये स्थानिक मराठी भाषकांनी एकत्र येऊन पथक स्थापन केले असून, त्यांच्या शैलीदार वादनाचा आवाज परदेशातही घुमत आहे. त्यात आता महिला ढोल-ताशा पथकेही आपल्या वादनाने वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) राहणार्‍या महिलांनी एकत्र येऊन स्वामिनी ढोल-ताशा पथकाची स्थापना केली असून, हे यूएईमधील पहिले महिला ढोल-ताशा पथक आहे. हे पथक आपल्या वादनाने लोकांची मने जिंकत असून, महिन्यातून दोन-तीन वेळा वादन करून वादक महिला दाद मिळवत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे, तर आता परदेशातही ढोल-ताशा वादनाची संस्कृती रुजत आहे. महिलांनी पथक सुरू केले असून, ढोल- ताशाचे वादन करून या महिला परदेशातही मराठी संस्कृतीचा वारसा जपत आहेत. या पथकांमध्ये लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असून, प्रत्येकजण वेळ काढून वादनाच्या या जगात रमत आहेत.

सुवर्णा पाटील, आसावरी आडघरे, पल्लवी निगडे, आसावरी पेडणेकर आणि सीमा मोहिते यांनी ढोल-ताशा व लेझीम पथकाची सुरुवात केली आहे. वर्षा काजारेकर, अश्विनी गावडे, वैशाली सोनार, श्रृती आंबेकर, दीपाली सामाले, ईशा टिकम, ऐश्वर्या रत्नालीकर, कादंबरी पालकर आदी महिला एकत्र मिळून यशस्वीरीत्या हे पथक चालवत आहेत. याव्यतिरिक्त अनन्या, अन्वी, अनाया या छोट्या मुलीही यात खारीचा वाटा उचलत आहेत. विशेष म्हणजे ढोल ताणणे, ते उचलून सगळीकडे घेऊन जाणे, ढोल बांधणे ही सगळी कामेसुद्धा याच महिला आणि मुली करतात. ऑगस्ट 2022 ला सुरू झालेल्या स्वामिनी ढोल – ताशा, लेझीम पथकाने यूएईमध्ये आतापर्यंत होळी, शिवराज्याभिषेक सोहळा, गणेशोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे वीसहून अधिक सादरीकरण केले आहे आणि आताही करत आहेत.

नोकरीच्यानिमित्ताने देशापासून लांब असलो तरी महाराष्ट्रीयन संस्कृती व परंपरांचा सातासमुद्रापलीकडे प्रसार व्हावा या उद्देशाने आम्ही स्वामिनी ढोल – ताशा पथकाची निर्मिती केली. सुवर्णा पाटील यांनी ढोल-ताशा पथक सुरू करण्याची कल्पना आमच्यासमोर मांडली व आम्हीही लगेच होकार दिला. या पथकामुळे मराठी महिलांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याचा आनंद आहे. आता पथकात 15 मराठी महिला कार्यरत आहेत.

आसावरी आडघरे, सदस्य, स्वामिनी ढोल-ताशा पथक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news