Pune News : प्रवासी न घेताच पीएमपी बस भुर्र! प्रवासी संतप्त | पुढारी

Pune News : प्रवासी न घेताच पीएमपी बस भुर्र! प्रवासी संतप्त

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज पीएमपी बसस्थानकासह कोंढवा रस्त्यावर सकाळच्या वेळेस बसमध्ये जागा असूनदेखील दरवाजा बंद करून प्रवासी न घेता गाड्या दामटवण्याचा प्रकार सर्रास निदर्शनास येत आहे. पीएमपी चालक व वाहकांच्या मुजोरीमुळे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवार (दि. 22) सकाळी साडेआठच्याच्या सुमारास कात्रज बसस्थानकात एका विद्यार्थिनीला नाहक या त्रासाला सामोरे जावे लागले.

कात्रज परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज कोंढवा रस्त्यावरील एका विद्यालयात पीएमपी बसने शिक्षणासाठी जात असतात. मात्र, बसमध्ये जागा असूनदेखील काही बसचालक व वाहक दोन्ही दरवाजे बंद करून थांब्यावर गाडा थांबवत नाहीत. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

कोंढवा रस्त्यावर अनेक बसचालक व वाहक प्रवासी न घेता गाड्या दामटवत असल्याचे प्रकार घडत आहे.एकीकडे पीएमपीएलचे चाक कमी उत्पनामुळे रुतले आहे, तर दुसर्‍याकडे मुजोर कर्मचारी प्रवासी न घेताच बस पळवित आहेत. अशा कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कात्रज-कोंडवा रस्त्यावर पीएमपी बस हे एकमेव सार्वत्रिक वाहतुकीचे साधन आहे. मात्र, अनेक चालक व वाहक प्रवासी न घेताचा गाड्या दामटवत आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.
– संकेत शिंदे, विद्यार्थी 
कात्रजवरून कोंढवा मार्गे हडपसरला जाणार्‍या बस माझ्या डेपोच्या नाहीत. प्रवाशांना न घेता बस पुढे नेणे चुकीची आहे. याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
-नाना हांडे, प्रमुख, कात्रज डेपो
हेही वाचा

Back to top button