Pune : पानशेत रस्त्यावरील सोनापूर पुलाचे काम सुरू

Pune : पानशेत रस्त्यावरील सोनापूर पुलाचे काम सुरू

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे – पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) येथील रखडलेल्या पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. संथगतीने काम सुरू असल्याने नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उभे आहे.
पानशेत – वरसगाव धरण भागासह वेल्हे, पश्चिम हवेली व मुळशी या तीन तालुक्यांना जोडणारा पुणे -पानशेत हा प्रमुख रस्ता आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जोरदार पावसात पुलासह रस्ता वाहून गेला. त्यामुळे पानशेत – वरसगाव भागाचा काही दिवस संपर्क तुटला होता. खडकवासला धरण व डोंगर यामुळे येथून पर्यायी रस्ताही तयार करणे अशक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुलाची उभारणी करण्यात येत आहे.

खचलेल्या पुलामुळे होणार्‍या गैरसोयीकडे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी थेट विधिमंडळात सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनाने पुलासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार म्हणाले, खडकवासला धरणातील पाण्याच्या लाटा रस्त्याला धडकत आहेत. तेथे पूल व लगतचा रस्ता खचत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुलाचे काम केले जात आहे. वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. आमदार तापकीर म्हणाले, अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल, रस्ता खचत आहे. कायमस्वरूपी टिकेल असा पूल उभारण्यासाठी शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news