आता एका क्लिकवर पाहता येणार दस्त

आता एका क्लिकवर पाहता येणार दस्त
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील जमीन, सदनिका तसेच दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचे सन 1985 पासूनचे दस्त एका क्लिकवर पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध केली आहे. इच ऑफ डुइंग बिझनेस या उपक्रमांतर्गत ही सुविधा देण्यात आली आहे. हे काम 50 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. जेवढे दस्तावेज स्कॅन झाले आहेत, तेवढे विभागाच्या ई-सर्च या पर्यायावर उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई आणि उपनगरांत यापूर्वीच दस्त ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदनिका किंवा जमीन खरेदी व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल पाहणे आवश्यक ठरते.

हे बदल पाहण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांचा शोध घ्यावा लागतो आणि मिळकत तपासणी अहवाल काढावा लागतो. सामाईक क्षेत्रात एकापेक्षा अधिक कार्यालये असतात. त्यामुळे नागरिकांना कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 1985 पासूनचे दस्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या सुविधेद्वारे शोधलेल्या दस्तांची किंवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्स) प्रत डाउनलोडही करता येते. तसेच प्रमाणित प्रत हवी असल्यास शुल्क आकारून ती देण्याच्या सुविधेचाही समावेश आहे. जुने दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दरम्यान, व्यवसायपूरकता उपक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून दिल्ली आणि मुंबई ही दोन शहरे निवडली होती. त्याअंतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या दोन्ही महानगरांमधील 1985 पासूनची सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.

राज्यातील 500 पेक्षा जास्त दुय्यम निबंध कार्यालयांमध्ये ही कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी मुंबईतील 45 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील सर्व जुन्या दस्तांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील दस्तांची माहिती ई-सर्च पर्यायावर उपलब्ध आहे. मुंबई वगळून इतर जिल्ह्यांतील काम 50 टक्के झाले आहे.
– अभिषेक देशमुख, उपमहानिरीक्षक (संगणक), नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग 

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news