पुण्यातील तरुणाने तयार केलेली ई-जिप्सी हवाई दलात | पुढारी

पुण्यातील तरुणाने तयार केलेली ई-जिप्सी हवाई दलात

पुणे : दिनेश गुप्ता :  देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी मानवविरहित ई-जिप्सी व प्रदूषण व साऊंड विरहित जिप्सी तयार करण्याचा अनोखा यशस्वी प्रयोग पुण्यातील राजीव रणदिवे यांनी करून दाखवला आहे. रणदिवे यांनी तयार केलेल्या जिप्सीवरून शनिवारी (दि. 17) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हवाई दलाची (आयएएफ) प्रतिष्ठित पासिंग आऊट परेडची मानवंदना स्वीकारली. लष्करी सीमेवर होत असलेली जीवितहानी पाहता पुण्यातील राजीव रणदिवे या संशोधकाने एक अनोखे ई कीट तयार करण्याचे काम सुरू केले. सीमेवर कोणीतरी आल्याचा सुगावा शत्रूंना लागत असे अन् त्यातून शत्रू अलर्ट होऊन भारतीय जवानांना सहज हेरून नुकसान करण्यात सफल होत होते. हेच कसे टाळता येऊ शकते यावर रणदिवे यांनी सलग पाच वर्षे संशोधन करून चारचाकी वाहनसह लष्करी वाहनासाठी कीट तयार करण्यात यश मिळविले. त्यांच्या यशस्वी प्रयत्नास ‘अर्थ बळ’ दिले ते पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या संचालकांनी.

राष्ट्रपतीच्या ताफ्यात…
पुण्यातील राजीव रणदिवे यांनी पिक्सी इलेक्ट्रिक कार्सच्या माध्यमातून ई वाहन कीट तयार करून साऊंड विरहित वाहन तयार केले. हेच वाहन यापूर्वी हैद्राबाद येथील हवाई दल परेड वापरून चाचणी घेतली गेली. मागील सहा महिने चाचणी घेतल्यावर हवाई दलाने ‘पिक्सीच्या जिप्सी’ला मंजुरी देत सामंजस्य करार केले. शनिवारी (दि. 17) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पासिंग आऊट परेड मानवंदनात हे वाहन दाखल करून घेतले.

असे आहे कीट…
जिथे माणसालाच मर्यादा पडतात अशा भागात म्हणजे वन व सीमाभागात मानवरहित जिप्सी तयार केली गेली. नव्या रूपातील जिप्सी अतिशय दणकट तयार केली असून त्यातून इंधनासह लष्कराच्या सामुग्रीची वाहतूक करणे शक्य आहे. या वाहनास एक कीट असे बसवल असून प्लॅन केलेल्या रूटवरच हे वाहन चालेल. गस्ती दरम्यान त्या वाहनावरील कॅमेरा काम करून जागेवरील संभाव्य धोक्याची सूचना कंट्रोल रूमला देत राहील.

जंगल सफारीसाठीही जिप्सी
जंगल सफारीची आवड असणार्‍या वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता ध्वनीविरहित जिप्सी वाहन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. वाहनाचे पहिले प्रोटोटाईप मॉडेल राजस्थानातील रणथंभोर व्याग्र प्रकल्पात वापरला जात आहे. याठिकाणी सर्वात कठीण भूभाग असल्याने या प्रोटोटाईप मॉडेल वाहनाची चाचणी दोन वर्षांपेक्षा जास्त घेण्यात येणार आहे. वन विभागाने या इलेक्ट्रॉनिक कनवर्जन कीट वाहनास ग्रीन सिग्नल दिला आहे. हवाई दलाकडून नुकतीच या वाहनाची ऑर्डर देण्यात आली असून पिक्सी इलेक्ट्रिक कार्स सोबत सामंजस्य करार केला आहे.

लष्करी सेवेत पुण्यातील संशोधकांचे विकसित ई कीट बसवलेले वाहन असणे हे माझे भाग्य समजतो. माझ्या संशोधनास ‘अटल इनोव्हेशन मिशन व मायक्रोसॉफ्ट’चाही पुरस्कार मिळाला आहे. हवाई दलाने सामंजस्य करार केले असून युरोप, आफ्रिका, नेपाल, भूतान या देशातूनही रूपांतरण कीटसाठी मागणी येत आहे.
                                          राजीव रणदिवे, एमडी, पिक्सी इलेक्ट्रिक कार्स, पुणे.

 पुण्यातील संशोधक राजीव रणदिवे यांनी विकसित केलेले ई वाहन आता हवाई दलबरोबर वन विभागातही दाखल झाले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी करण्यात यश आले आहे.
                           राजेंद्र जगदाळे, संचालक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क 

हे ही वाचा : 

भोगावती कारखान्यासाठी 23 जुलैला मतदान?

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष करात 36 टक्क्यांची वाढ!

Back to top button