यंदा राज्यात उष्माघाताचे तिप्पट रुग्ण | पुढारी

यंदा राज्यात उष्माघाताचे तिप्पट रुग्ण

पुणे : प्रज्ञा केळकर-सिंग :  यंदा राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही तिपटीने वाढ झाली. यंदा राज्यात 2,528 संशयित उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 767 होती. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठत नवे विक्रम प्रस्थापित केले. उच्च उष्मा निर्देशांक आणि उच्च तापमानामुळे अनेक नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. सापेक्ष आर्द्रता जास्त असल्याने उष्णता निर्देशांक जास्त झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तीव्र  उष्णतेच्या लाटेमुळे निर्जलीकरण, त्वचेच्या समस्या, हृदयाशी संबंधित आजार, शुद्ध हरपणे असा त्रास उष्माघाताच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळाला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील बहुतेक भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा कडक उन्हाळ्याचा यावर्षी सामना करावा लागला. महाराष्ट्रातील किमान 10 जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या मध्यात दिवसाचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती लक्षणीयरीत्या जास्त असल्याने राज्यात किमान तापमानदेखील सामान्यपेक्षा जास्त होते. एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक सामना करणाऱ्या राज्यांमध्ये यंदा महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांना उपचारांची सुविधा निर्माण करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय पातळीवरील आरोग्य कर्मचा-यांनाही उष्णता विकार प्रतिबंध अणि नियंत्रणविषयक प्रशिक्षण देण्यात आले असून, आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यंदा उष्माघाताच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. कारण गेल्या उन्हाळ्याच्या तुलनेत हवामानाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षीप्रमाणे, 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात उष्माघाताच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सर्व जिल्हे, नगरपालिका, महानगरपालिकांना उष्माघात कक्षाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
                               – डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य सेवा

हे ही वाचा : 

पुणे महापालिकेत लवकरच तिसरी पदभरती

पुण्यातील तरुणाने तयार केलेली ई-जिप्सी हवाई दलात

Back to top button