

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील सर्वात जुना सजीव आजही जिवंत असून तो पर्वतीवर आहे. नानासाहेब पेशव्यांच्या वाड्यात मध्यभागी एक मीटर उंचीचा चाफा आहे. तो 1882 मध्ये लावला असून आजही वसंतात फुलतो, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर यांनी वसंतवैभव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना दिली. अॅडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीने पर्वती पायथ्याजवळील महालक्ष्मी सभागृहात वसंतवैभव व्याख्यानमालेची सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच्या व्याख्यानाला इतकी गर्दी होती की, सभागृह कमी पडले. प्रा. घाणेकर यांनी वसंतऋतूत फुलणार्या विलोभनीय वनस्पतींची ओळख करून दिली.
अधूनमधून त्यांच्या शाब्दिक कोट्यांनी बहार आणली. ते म्हणाले की, सध्या वसंत ऋतू सुरू आहे. बहुतांश वनस्पतींची पानगळ सुरू आहे. तर काहींची पूर्ण होऊन सुंदर फुले आली आहेत. वनस्पती फुला- पानांवरून ओळखायच्या कशा, त्यांची वनस्पती शास्त्रातील नावे, देशी, बोली भाषेतील नावे सांगितली.
पूर्वी बहावा पिवळ्या गर्द फुलांनी फुलला की, मान्सून जवळ आल्याची खूण असे, मात्र आता तो लवकर फुलतो. त्यामुळे बहावा आणि मान्सून यांचे नाते तुटले. निसर्ग बदलत आहे. ऋतूचक्रही बदलत आहे. जंगल विरळ होत आहेत. त्यामुळे फुल- झाडांची जोपासना करा. निसर्गात भटकंती करा. झाडांची माहिती पुढच्या पिढीला भरभरून द्या, असे आवाहन प्रा. घाणेकर यांनी केले.
पर्वतीवर कधी गेलात तर नानासाहेब पेशवे यांच्या वाड्यात मध्यभागी लावलेला पांढरा चाफा आवर्जून पहा. तो अवघ्या एक मीटर उंचीचा आहे. तो 1882 मध्ये लावला आहे. आज त्याचे वय सुमारे 315 वर्षे आहे. चाफा ही भारतीय वनस्पती नाही, ती दक्षिण अमेरिकेतून आपल्या देशात आली, अशी माहिती प्रा. घाणेकर यांनी दिली.
या वेळी प्रा. घाणेकर यांनी जांभळाच्या झाडाची फुलं, वाघाटी, रत्नपुरुष, काटेसावर, गणेरी, अंजन आणि अंजनेरी यांचे फोटो स्लाईड- शोद्वारे दाखवत दुर्मिळ माहिती दिली, ती ऐकण्यासाठी पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती.
इंग्रजांनी जी नावं दिली तीच आपण आजही वापरतो. वेस्टर्न घाट असा प्रकारच नाही. तो सह्याद्री आहे. त्याला सह्याद्रीच म्हटले पाहिजे. सह्याद्री आपला बाप आहे, त्याचे नाव बदलू नका. उद्या ही इंग्रजी मंडळी हिमालयाला नॉर्दन घाट म्हणतील, चालेला का तुम्हाला, असा सवालही प्रा. घाणेकर यांनी केला.
हेही वाचा