जपानमध्ये पिकवला जातो जांभळा आंबा! | पुढारी

जपानमध्ये पिकवला जातो जांभळा आंबा!

टोकियो : उन्हाळा आला की, आपल्या सर्वांना वेध लागतात ते आंब्याचे. सध्या बाजारात आंबे आले आहेत, ज्यात हापूस, रत्नागिरी, देवगड आंब्यांचा समावेश आहे. नावाप्रमाणेच प्रत्येक आंब्याची चव वेगळी असते आणि आकारही. रंगही भिन्न असतात. अर्थातच, किमतीही वेगवेगळ्या असतात. पण, आपण कधी जांभळ्या रंगाची कल्पना करू शकतो का, असा प्रश्न विचारल्यास साहजिकच त्याचे नकारार्थी उत्तर येइंल. पण, एक देश असाही आहे, जेथे जांभळ्या रंगाचा आंबा पिकवला जातो. पण, या जांभळ्या आंब्याची किंमत इतकी महागडी आहे की, त्याच्या एक किलोच्या दरात आपण कितीतरी किलो हापूस सहज विकत घेऊ शकतो.

जपानमध्ये मिळणार्‍या या आंब्याचे नाव ‘मियाझाकी’ असून, नावापेक्षाही या आंब्याची किंमत विशेष लक्षवेधी आहे. हा आंबा थोडाथोडका नव्हे, तर चक्क पावणेतीन लाख रुपये प्रति किलो, अशा अव्वाच्या सव्वा दराने विकला जातो. यातील एका आंब्याचे वजन जवळपास 350 ग्रॅम असते आणि त्यातील साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक असते. हा आंबा अतिशय खास पद्धतीने तयार केला जातो. झाडाला फळे लागल्यानंतर प्रत्येक आंबा जाळीच्या कापडाने बांधला जातो. त्यामुळे त्याचा रंग बदलतो.

मियाझाकी आंबा पिकवण्याची पद्धत सोपी नाही. हा आंबा पिकवताना विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच हा आंबा फार कमी प्रमाणात तयार होतो, त्यामुळे त्याची मागणी खूप जास्त राहते. तज्ज्ञांच्या मते, मियाझाकी आंब्यामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाणारे व्हिटॅमिन ए उत्तम प्रमाणात आढळते, याशिवाय, यातील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याचवेळी, या आंब्यामधील पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित करते.

Back to top button