

सुरत : सोशल मीडियावर एका चालत्या-फिरत्या झोपडीचा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. अगदी थेट रस्त्यावर विविध वाहने आणि स्कूटर्समध्ये या धावत्या झोपड्या अर्थातच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्हायरल होत असणारा हा व्हिडीओ गुजरातमधील सुरत येथील असल्याचा दावा केला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून, एका महाभागाने आपल्या कारभोवतीच असे झाडाचे आवरण तयार केले आहे आणि यामुळे झोपडी रस्त्यावर धावत असल्याचा भास होतो आहे.
या महाभागाने कारला जे झोपडीचे रूपडे दिले आहे, ते नेटिझन्सच्या पसंतीस उतरले असून, यावर अनेक प्रतिक्रियांची आतषबाजी होत आहे. अतिशय साध्या कारप्रमाणे ही झोपडीकार चालत असल्याने सदर क्लिप बरीच व्हायरल होते आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत त्याला 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यातील दीड लाखाहून अधिक नेटिझन्सनी हा व्हिडीओ लाईक देखील केला आहे. काहींनी ही कार जावेद उर्फीची असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी या कल्पकतेचे मनापासून कौतुक करताना याला 'वंडर कार' असे नाव दिले आहे.