

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यभर वातावरण तापले असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, असे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर कुणबीसाठी अर्ज करणार्यांची संख्या वाढली असून, खेड तालुक्यात दोन दिवसांत 27 जणांनी कुणबी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर महसूल पुरावे संबंधित यंत्रणेने शोधून कुणबी दाखले द्यायचे आहेत.
संबंधित बातम्या :
शासनाच्या आदेशपूर्वीदेखील पुणे जिल्ह्यात सरसकट कुणबी दाखल्याचे वाटप करण्यात येत होते. यामध्ये प्रामुख्याने राजकारणी लोक व शैक्षणिक कारणांसाठी दाखले काढण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु, यासाठी आवश्यक असलेले पुरावे गोळा करणे व दाखले मिळवणे मोठे कठीण काम होते. यामध्येदेखील 'एजंटगिरी'मुळे मराठा समाजाला कुणबी दाखला मिळण्यासाठी मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता शासनाने केवळ अर्ज केल्यानंतर प्रशासनानेच आवश्यक पुरावे शोधून दाखले द्यायचे आहेत.
राज्य शासनाने कुणबी दाखल्यासंदर्भात 31 ऑक्टोबर रोजी स्वतंत्र अध्यादेश काढले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत तहसीलदार कार्यालयात कुणबी दाखले मिळण्यासाठी अर्ज करणार्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये आता 27 अर्ज दाखल झाले असून, शासनाच्या आदेशानुसार तातडीने प्रक्रिया सुरू आहे.
– प्रशांत बेडसे, तहसीलदार खेड