

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याला हादरवून सोडणार्या मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेतील सहा वर्षांच्या चिमुकलीला घटनेच्या वीस महिन्यांतच न्याय मिळाला. चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करीत तिची निर्घृण हत्या करणार्या नराधम तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय 24) यास पुण्याच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली, तर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधमाची आई सुजाता महिपती दळवी (वय 48, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) हिला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणाची अत्यंत जलदगतीने सुनावणी घेत विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
ही धक्कादायक घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी घडली. नागपंचमीनिमित्त शाळेला सुटी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली. पोलिसांनी गावात शोध मोहीम राबविली. दुसर्या दिवशी (3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडपांत या मुलीचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला. याप्रकरणी चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत चोवीस तासांच्या आत चिमुकलीच्या शेजारी राहणार्या तेजस दळवीला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या घराच्या झडतीत खाटेवर आणि न्हाणीघरातील टाईल्स व बादलीवर मुलीचे रक्त सापडले. तसेच, आरोपीने वापरलेला चाकू, मुलीची जीन्स, तिच्या कानातील रिंगही सापडली. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.
तेजस दळवी एका फार्महाऊसवर कामाला होता. तेजसला अश्लील व्हिडीओ पाहण्याचे व्यसन होते. हातात सुरा असलेले फोटो तो समाजमाध्यमांवर टाकायचा. घटनेच्या दिवशी सुटीमुळे तो घरीच होता. त्याने दुपारी घराशेजारी खेळत असलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेत मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखविले आणि बलात्कार केला. त्याला विरोध केल्याने आरोपीने चिमुकलीचा गळा आवळला. त्यात ती गतप्राण झाल्याचे समजून तिला मोरीत फेकले. मात्र, तिचा आवाज आल्यावर आरोपीने चाकूने तिच्या गळ्यावर चार वेळा वार करून निर्घृण खून केला. तिचा मृतदेह पोत्यात टाकून घराच्या पाठीमागे पुरला. त्यावर फांद्या लावून त्याने गावातून पुण्याच्या दिशेने पोबारा केला. दुसर्या दिवशी तो थेट कामावर निघून गेला.
चिमुकलीला आरोपीसोबत एकत्र पाहणार्या गावातील एका महिला साक्षीदाराची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. याखेरीज मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण 29 साक्षीदार तपासले.
युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या निवाड्यांचे दाखले दिले. दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 एबी तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला 'डेथ पेनल्टी' देण्यात यावी. आरोपीने लैंगिक वासना शमविण्यासाठी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील कावेडिया यांनी केला. बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपीचे म्हणणेही ऐकून घेतले. त्या वेळी आरोपीच्या चेहर्यावर पश्चात्तापाचा लवशेषही नव्हता.
तेजसची आई सुजाता दळवी अंगणवाडीसेविका आहे. गावातून चिमुकली बेपत्ता असल्याची चर्चा कानावर येताच तिने घरात रक्त पाहून पसार झालेल्या तेजसला वारंवार फोन केले. त्यानंतर तिने घरामागे पुरलेला चिमुकलीचा मृतदेह काढून शाळेच्या मागे झुडपात फेकला. त्यामुळे तिच्यावर कलम 201 नुसार पुरावा नष्ट केल्याचा आरोप सिद्ध झाला.
घराशेजारी राहणार्या आरोपीने हे कृत्य केले. माझ्या मुलीला ज्याप्रकारे यातना झाल्या असतील, त्या आता आरोपीला कळतील. आमच्या एकुलत्या एक मुलीला न्याय मिळाला. आरोपीसह त्याच्या आईलाही आणखी शिक्षा व्हायला हवी होती.
– सहावर्षीय चिमुकलीचे वडील
हेही वाचा