केजरीवालांच्या अटकेबाबत इंडिया आघाडीकडून शरद पवारांचे मोठे विधान..! | पुढारी

केजरीवालांच्या अटकेबाबत इंडिया आघाडीकडून शरद पवारांचे मोठे विधान..!

बारामती : पुढारी वृत्तसेवा : ईडी, सीबीआय व अन्य एजन्सीजचा वापर करून नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत तेच घडले आहे. इंडिया आघाडी म्हणून आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, पण याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी दिला.
बारामतीत गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडवला गेला. आता केजरीवाल यांच्याबाबत तो घडला. त्यांना सात ते आठ वेळा समन्स पाठवली गेली आणि गुरुवारी रात्री मद्य धोरणाबद्दल त्यांना अटक केली. वास्तविक प्रत्येक राज्यात हे धोरण असते.

दिल्लीत केजरीवाल यांनी त्यासंबंधी पॉलिसी तयार केली होती. तो अधिकार मंत्रिमंडळाला निश्चित आहे. त्यात काही चुकले असेल तर लोकांसमोर जात निवडणुकीत तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता. परंतु, तसे न करता अटक केली गेली. राज्याच्या प्रमुखाने धोरणे ठरवली म्हणून त्याला अटक करणे हे अतिशय चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा इथंपर्यंत भाजप पोहोचले आहे. पण इंडिया आघाडी केजरीवाल यांच्यासोबत असेल. तामिळनाडूतील एका मंत्र्यावर आरोप झाले. न्यायालयात त्याचा निकाल झाला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथच दिली नाही. एका राज्याचे राज्यपाल शपथ द्यायची नाही हे कसे सांगू शकतात, त्यांना दिल्लीवरून कोणी तरी सांगितले असावे.

हेही वाचा

Back to top button