पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये पीएचडीच्या फक्त 20 विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. मागील वर्षी हाच आकडा चक्क शून्यावर होता. दीड हजाराच्या आसपास संशोधक विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध विभागांत आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहन देण्यात विद्यापीठ प्रशासन कमी पडत असून, अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड आणि शंतनू लामधाडे यांनी संशोधन पाठ्यवृत्तीविषयी प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. त्यांना देण्यात आलेल्या उत्तरांत संशोधनाबाबत विद्यापीठाची उदासीनता दिसून येत आहे.
विद्यापीठात विभागनिहाय पीएचडी किंवा पोस्टडॉक करणार्या विद्यार्थ्यांची संख्या किती, त्यातील किती विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती दिली जाते, विद्यापीठ किती विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती देते, विद्यापीठातील शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्ती योजना कोणत्या, विभागनिहाय किती प्रकल्प सुरू आहेत, त्यासाठी किती निधी उपलब्ध केला आहे, संशोधन प्रकल्पावर काम करणार्या विद्यार्थ्यांची संख्या किती, असे प्रश्न अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड आणि शंतनू लामधाडे यांनी विचारले होते. अधिसभा सदस्यांना देण्यात आलेल्या उत्तरामध्ये उदासीनता दिसून आली आहे. उत्तरात देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यापीठात 1 हजार 441 संशोधक विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना शिष्यवृत्ती मिळते का नाही, विभागवार त्यांची संख्या किती, प्रकल्पांची संख्या, त्यांना मिळणारा निधी, याची पुरेशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे नसल्याचे दिसून आले.
उत्तरांत सविस्तर आकडेवारीचा अभाव आहे. विद्यापीठात 38 पेक्षा अधिक विभाग असून, प्रकल्पांची संख्या फक्त 69 आहे. एकेकाळी विद्यापीठातील विभागांना अनेक मान्यवर संस्थांसह उद्योगांकडून प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता. पण, दिवसेंदिवस वाढत जाणारी उदासीनता आणि उपयोजित संशोधनाच्या अभावामुळे अनेक संस्थांकडून प्रकल्प येणे बंद झाले आहे. विद्यापीठाकडून केवळ 20 विद्यार्थ्यांना भारतरत्न जेआरडी टाटा फेलोशिप देण्यात येते, तर विद्यापीठ निधीतून पाठ्यवृत्ती मिळणारे 'पोस्ट डॉक'चे 13 विद्यार्थी असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संशोधनाबाबतीत विद्यापीठ प्रशासन उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा