Lok Sabha polls 2024 : गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? | पुढारी

Lok Sabha polls 2024 : गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सुप्रसिद्ध अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा आहुजा (Govind Ahuja) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. तो लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याला प्रवेश देऊन मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने (Govind Ahuja) मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी गोविंदाला मुंबईतून लोकसभा लढण्याची ऑफर दिल्याचे कळते. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गजानन कीर्तिकर यांचे वय लक्षात घेता त्यांच्या जागी गोविंदाला (Govind Ahuja) उमेदवारी देण्याची खेळी मुख्यमंत्री खेळणार का? हे येत्या आठवडाभरात स्पष्ट होणार आहे. गोविंदाने याआधी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ मध्ये लोकसभा लढवून भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र खासदार म्हणून छाप पाडण्यात त्याला अपयश आले होते. तसेच त्याला प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याच्या कानाखाली आवाज काढल्यामुळे गोविंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यानंतर तो राजकारणातून दूर गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याला शिवसेनेत सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Back to top button