

Pune Rekha Konde Assault Case: पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये काही महिला रेखा कोंडे यांचे केस ओढून त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे पुण्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा कोंडे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्ष (महिला आघाडी) आरती मारणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोशल मीडियावर एकमेकींनी केलेल्या टीका आणि आरोपांमुळे हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे. रेखा कोंडे यांनी एक चुकीचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आरती मारणे यांनी केला होता. यावरून दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
दुसरीकडे, आरती मारणे या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत असल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे. सोशल मीडियावर सुरू झालेला हा वाद पुढे इतका वाढला की, त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. याचदरम्यान रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचे केस ओढून त्यांना मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे.
या घटनेनंतर रेखा कोंडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे आरती मारणे, त्यांची आई, मुलगी आणि पूनम दाभेकर अशा एकूण चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
दरम्यान, या वादानंतर दोन्ही बाजूंनी कारवाईची मागणी केली जात आहे. रेखा कोंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरती मारणे यांची अखिल भारतीय मराठा महासंघातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली जात आहे. आता या प्रकरणात पोलीस पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.