

पुणे: राज्यात सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असतील तरच पदोन्नती देण्यात येणार आहे. केवळ अनुभवाच्या जोरावर शिक्षकांना पदोन्नती देता येईल का यासंदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईकडे विचारणा करण्यात आली आहे. परंतु, यासंदर्भात कोणत्याही सूचना आल्या नसल्यामुळे सध्या तरी केवळ टीईटी उत्तीर्ण उमेदवारांनाच पदोन्नती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे अवर सचिव शरद माकणे यांनी प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांना दिलेल्या निर्देशानुसार, शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती शासनाकडे करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्याप कोणताही अभिप्राय मिळाला नाही.
त्यामुळे न्याय निर्णय पारीत झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर तूर्तास पदोन्नती देता येणार नाही.
ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. त्यांनाच पदोन्नती दिली जावी असे स्पष्ट निर्देश माकणे यांनी दिले आहेत.