

पुणे: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून, अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरीची शक्यता वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्वच पक्षांनी शेवटपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत.
आघाडी व युतीसंदर्भातील संभमामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांनी खबरदारी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. ज्यांना अधिकृत एबी फॉर्म मिळेल, त्यांनाच पक्षाचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या ठिकाणीच एबी फॉर्म वितरित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग््रेास तसेच राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांची अंतिम निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, त्या सूचनांनुसार आज शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. पक्षाची अधिकृत यादी अंतिम क्षणीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग््रेास आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी झाल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी उशिरा करण्यात आली. या आघाडीनुसार वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेमधील 15 गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या 40 ते 50 जागांवर निवडणूक लढविणार आहे. काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शन तेलंग यांनी ही माहिती दिली.
दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना युतीबाबत शेवटपर्यंत अनिश्चितता कायम होती. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांनी सांगितले की, युतीसंदर्भातील प्रस्ताव भाजपकडे सादर करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते, त्या जागांवर या वेळीही शिवसेना निवडणूक लढविणार आहे. तसेच, मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या उमेदवारांची यादीही भाजपकडे पाठविण्यात आली आहे. युतीचा निर्णय झाला नाही, तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही उमेदवारांची नावे गुप्त ठेवत पक्षांकडून आखलेली ही रणनीती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चुरस वाढवणारी ठरणार आहे.
73 गटांसाठी 204 उमेदवारांचे अर्ज
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी एकूण 4 हजार 607 उमेदवारी अर्जांची खरेदी केली आहे, तर 509 उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी 1 हजार 872, तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 2 हजार 735 अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी 204 उमेदवारांकडून अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खेड तालुक्यातून 34, भोर 31, इंदापूर 30, दौंड 23, हवेली 17, तर बारामतीमधून 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वांत कमी म्हणजेच 5 उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यातून दाखल झाले आहेत. पंचायत समितीच्या 146 गणांसाठी आतापर्यंत 2 हजार 735 अर्जविक्री झाली असून, 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात खेड तालुक्यातून 54, बारामती 49, भोर 39, मुळशी 38, शिरूर 21, तर दौंड व पुरंदर तालुक्यांतून प्रत्येकी 15 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वांत कमी 9 अर्ज जुन्नरमधून दाखल झाले आहेत.