

बारामती: ‘तू इन्स्टाग््राामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये मी दिसत आहे, तो डिलीट करून टाक,’ असे सांगत अल्पवयीन तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवत कोयत्याने मारहाण केली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर मारहाणीसह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दि. 16 रोजी रात्री 8 वाजता तांदूळवाडीतील भैरवनाथ मंदिरामागे घडली.
तांदूळवाडीत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलाने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार सार्थक लक्ष्मण अंबुरे, आकाश धनंजय अंबुरे, बापू गौतम अंबुरे, पोपट गौतम अंबुरे, लखन अशोक अंबुरे (सर्व रा. तांदूळवाडी, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेत संबंधित अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तांदूळवाडीत आलेल्या बाळूमामाच्या पालखीचा व्हिडीओ फिर्यादीने काढून तो इन्स्टाग््राामवर अपलोड केला होता. त्यानंतर रात्री 8 वाजता भैरवनाथ मंदिराकडे तो जात असताना सार्थक अंबुरेने त्याला बाजूला बोलावले. इन्स्टाग््राामवर टाकलेल्या व्हिडीओत मी दिसतो आहे, तो व्हिडीओ डिलीट कर, असे त्याने सांगितले.
त्यावर मी मुद्दामहून केलेले नाही, गर्दीमुळे व्हिडीओत तू आलेला आहे, असे फिर्यादीने सांगण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आकाश, बापू, पोपट व लखन हे त्याच्याजवळ आले. त्यापैकी आकाश याने तू लय बोलतोय का? असे म्हणत त्याच्याकडील पिस्तूल काढून दाखवून तुला बघायचंय का? अशी धमकी दिली.
त्या वेळी सार्थकने पाठीमागून डोक्यात कोयता मारून गंभीर दुखापत केली. बापू, पोपट, लखन यांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सार्थक व आकाश यांनी तू जर घरी काही सांगितले किंवा पोलिसात तक्रार दिली तर तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोढणार नाही, अशी धमकी दिली. जखमी फिर्यादीला तेथे जमलेल्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेले. त्यानंतर फिर्यादीने ही बाब घरी सांगत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.