

गणेश खळदकर
पुणे : येत्या 23 नोव्हेंबरला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टिईटी परीक्षेत बोगस किंवा डमी उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यूचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा राज्य परिषदेच्या रडारवर बोगस उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Latest Pune News)
टीईटी परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून राज्यभरातून एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवार परीक्षेस प्रवीष्ट झाले असून. यापैकी किमान दीड ते दोन लाख कार्यरत शिक्षक परीक्षेत प्रविष्ट आहेत. मागील 2024 च्या टीईटी परीक्षेप्रमाणेच या परीक्षेला देखील बायोमेट्रीक विथ फेस रिकग्नीकेशन, लाईव्ह सीसीटिव्ही विथ एआय, फ्रायस्किंग या सुविधा सर्व परीक्षा केंद्रांवर अंमलात आणणार आहोत. याव्यतिरिक्त या वेळी नव्याने काही सुविधा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात येणार आहे.
‘फोटो व्ह्यू’मध्ये मागील केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या सर्व टीईटी तसेच टीएआयटी परीक्षांमधील उमेदवारांचे फोटो व नावे या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात येणार असून, एक उमेदवार व दोन वेगवेगळे फोटो किंवा एकच फोटो मात्र दोन वेगवेगळी नावे असलेल्या उमेदवारांची यादी, तसेच एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर अनेक अर्ज भरलेले असल्यास अशा उमेदवारांची यादी परीक्षेपूर्वीच पडताळणीसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेच्या वेळी बोगस, डमी उमेदवारांची ओळख तत्काळ करता येणार आहे. त्याचबरोबर कनेक्ट व्ह्यूमध्ये प्रत्येक परीक्षा केंद्र संचालक, परीक्षा सनियंत्रण कक्ष व परीक्षा परिषद यांच्याकडे हॉटलाइनचे फोन उपलब्ध असतील. या लँडलाइन फोनच्या माध्यमातून त्या सेंटरचा कोड नंबर डायल केल्यावर तत्काळ काही क्षणातच संपर्क करता येऊ शकेल. तसेच या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्र संचालकांसाठी विविध सूचनादेखील एकाच वेळी देता येणार आहेत. तसेच केलेल्या फोनचे व त्यामधून केलेल्या सूचनांचे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. त्यामुळे यंदा परीक्षा आणखी कडक करण्यासाठी परीक्षा परिषदेने पावले उचलली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षेच्या आयोजनामध्ये शिक्षण विभागाचे किमान 25 हजार कर्मचारी व अधिकारी 22 व 23 नोव्हेंबर 2025 या दोन्ही दिवसांकरिता कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर, 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. दि. 23 नोव्हेंबर, 2025 रोजी आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये वरील परिस्थिती नमूद केल्यानुसार तब्बल दोन लाख शिक्षक परीक्षार्थी, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असल्यामुळे दि. 22 व 23 नोव्हेंबर रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही या शिक्षक परीक्षार्थी व परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे निवडणूक प्रशिक्षण घेणे योग्य होणार नाही. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी दि. 24 किंवा 25 नोव्हेंबरला निवडणुकीचे अतिरिक्त प्रशिक्षण घेता येणार असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहावी व परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने घेतली जावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. या माध्यमातून परीक्षेतील बोगस उमेदवारांवर लक्ष ठेवण्याबरोबरच परीक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शक पार पाडण्यावर आमचा भर आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद