Navratri 2023 : पुण्यात दुसर्‍या माळेला मंदिरांत गर्दी

Navratri 2023 : पुण्यात दुसर्‍या माळेला मंदिरांत गर्दी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवाच्या दुसर्‍या माळेला म्हणजेच दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि.16) शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये आनंदी, उत्साही वातावरण होते. सकाळी दर्शनासाठी सुरू झालेली भाविकांची गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. तर नवरात्र उत्सव साजरा करणार्‍या मंडळांच्या ठिकाणीही उत्सवाचा रंग पाहायला मिळाला. सायंकाळनंतर रंगलेल्या दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांत तर तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. घराघरांत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन देवीची आरती, आराधना केली.

उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी देवीच्या मंदिरांमध्ये, मंडळांच्या ठिकाणी, सोसायट्यांमध्ये आणि घरोघरी चैतन्याची पालवी फुलली होती. देवीच्या मंदिरांमध्ये भजन-किर्तन, प्रवचनांच्या कार्यक्रमांनी रंग भरला, सायंकाळी तर विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळले होते. चतृ:शृंगी देवी मंदिर, ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री भवानी देवी मंदिर (भवानी पेठ) आदी ठिकाणी दर्शनासाठी गर्दी झाली होती. ती रात्रीपर्यंत कायम होती. भाविकांनी देवीचे दर्शन घेत सुख-समृद्धीची कामना केली. काही मंदिरांमध्ये पोलिस बंदोबस्तही होता.

मंदिरांमध्येआदिशक्तीच्या आगमनानंतर हर्षोल्हास आणि भक्तीपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. तर मंडळांकडून विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम झाले. उत्सवाच्या दुसर्‍या माळेला घरोघरीही मनोभावे आराधना करण्यात आली, महिला-युवतींनी उपवासही केला. महिला-युवतींनी नवरात्र उत्सवानिमित्त रंगानुसार पेहराव केला होता. उत्सवानिमित्त महिलांचा सन्मान, विविध स्पर्धा, महिलांच्या हस्ते आरती, दांडिया – गरबाचे कार्यक्रम ठिकठिकाणी रंगले. सोसायट्यांमध्येही दांडिया-गरबाचे कार्यक्रम झाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news