Teacher Recruitment : अद्यापही शिक्षकांच्या 10 हजारांवर जागा रिक्त

Teacher Recruitment : अद्यापही शिक्षकांच्या 10 हजारांवर जागा रिक्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून, पात्र उमेदवारांची शिफारस केल्यानंतरही शिक्षकांच्या तब्बल 10 हजारांवर जागा रिक्त राहिल्या आहेत. यातील मुलाखतीशिवाय पदभरतीच्या तब्बल 5 हजार 714 जागा रिक्त राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाखती- शिवाय भरतीच्या 5 हजार 714 जागा रिक्तच

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार एकूण 21 हजार 678 पैकी मुलाखतीशिवाय 16 हजार 799 पदे होती. त्यातील 11085 उमेदवारांची शिफारस झाली, तर 5 हजार 717 पदांसाठी शिफारस झालेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (15 टक्के) उमेदवार नसल्यामुळे 2 हजार 357 जागा व अंशकालीन (10 टक्के) उमेदवार नसल्यामुळे 1 हजार 536 जागा तसेच खेळाडू (5 टक्के) उमेदवार नसल्यामुळे 568 जागा रिक्त राहिल्या आहेत.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार, भाषा विषयाचा विचार करता पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम 1585, मराठी माध्यम 870, उर्दू माध्यम 640 जागा व सहावी ते आठवी गटातील गणित-विज्ञान 2238 जागा रिक्त राहिल्या आहेत. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी 1:1 या प्रमाणात उमदेवार देण्यासाठी व्यवस्थापननिहाय त्यांच्या जाहिरातीतील पदे विचारात घेऊन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी घेण्याची तरतूद आहे.

त्यानुसार मुलाखतीशिवाय जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जातील. मुलाखतीसह या प्रकारातील एकूण 4 हजार 879 जागांची मुलाखतीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही सुरू आहे. 1:3 ऐवजी 1:10 या प्रमाणात उमेदवार देण्याबाबत शासन आदेश व न्यायालयीन प्रक्रिया विचारात घेऊन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शासनपत्र 21 फेब्रुवारी 2024 नुसार नियमावलीमध्ये सुधारणा होईपर्यंत 1:10 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या 1189 संस्थांना 4879 रिक्त पदांसाठी योग्य ती प्रक्रिया करून 1:10 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखती शिवाय पदभरतीसाठी 1:1 या प्रकारात निवडलेले उमेदवार वगळून अन्य उमेदवारांमधून मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी 30 गुणांची तरतूद केली असून, उमेदवारांची निवड संस्था करणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news