प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई करा : आ. राहुल शेवाळे यांची मागणी

प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई करा : आ. राहुल शेवाळे यांची मागणी

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : शेवाळेवाडी परिसरात नियम पायदळी तुडवून मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरविणारी बांधकामे सुरू आहेत, त्यामुळे शेवाळेवाडी व परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या बांधकाम प्रकल्पांवर तातडीने योग्य ती कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियानचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेवाळे यांनी दिले.

याबाबतचा संपूर्ण विषय समजावून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले. पुणे शहरातील वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे प्रशासनाने प्रदूषण पसरविण्यास कारणीभूत ठरणार्‍या बांधकाम प्रकल्पांना प्रदूषण पसरविणारी ही कामे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शहराच्या पूर्व परिसरात शेकडो एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांद्वारे बांधकाम नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे.

परिसरातील नागरिकांना त्रास

शेवाळेवाडी परिसरात असलेल्या एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. कालव्याच्या भरावावरून बांधकाम साहित्य तसेच राडारोडा वाहून नेणारी अवजड वाहतूक केली जात आहे. त्यामुळे कालव्याचा भराव खचला आहे. धुरळा पसरून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढले आहे. काम करण्यासाठी मोठा मजूरवर्ग येथे असून, त्यांची अधिकृत नोंदणी नाही. सायंकाळी परिसरात हजारो मजूर उघड्यावर मद्यपान करतात, त्यातून वारंवार वाद होतात. याच वादातून मागील आठवड्यात एका मजुराचा खून झाला.

शेवाळेवाडी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्या-या या बांधकाम प्रकल्पांवर सरकारने तातडीने कारवाई करावी यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालय, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या संबंधित बांधकाम प्रकल्पांना नियमांचा भंग केल्याप्रकरणी करण्यात आलेला दंड अपुरा असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

– राहुल शेवाळे, अध्यक्ष, स्वच्छ भारत अभियान, पश्चिम महाराष्ट्र

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news