

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंत्रालयातील राज्याच्या नगरविकास विभागाला नुकताच पाठवला आहे. या प्रस्तावित करण्यात आलेल्या हद्दवाढीला लगतच्या ग्रामपंचायतींचा प्रखर विरोध आहे. प्रस्तावित हद्दवाढीतील 16 गावच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचा चाकणनगर परिषदेत समाविष्ट होण्यास विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. 20) निघोजे (ता. खेड) येथे बैठक झाली. या वेळी हद्दवाढ विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
चाकणलगतचे ग्रामीण क्षेत्र नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. नगरपरिषदेच्या हद्दवाढीमध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे या गावांचा समावेश करून भविष्यात अनेक मोठ्या समस्या निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेची हद्दवाढ करून येथील यंत्रणा कार्यक्षम करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु ग्रामपंचायतीनी हद्दवाढीस विरोध तीव— केला आहे. निघोजे येथील बैठकीतून ग्रामपंचायती अधिक आक्रमक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. पुढील दोन दिवसांत यातील विविध ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करून राज्याचे मुख्यमंत्री, नगर विकासमंत्री यांना निवेदने व ठराव घेऊन भेटणार असल्याचे या वेळी ठरवण्यात आले. जबरदस्तीने व स्थानिक ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता याबाबत निर्णय घेतल्यास आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
तीव्र आंदोलन करणार : पाटीलबुवा गवारी
चाकणनगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाला चाकणलगतच्या 16 गावच्या सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधींचा व ग्रामस्थांचा विरोध आहे. यापूर्वीदेखील हा विरोध आम्ही नोंदवला आहे. शासनाने बळजबरीने आम्हाला चाकण नगरपरिषदेमध्ये समाविष्ट केल्यास आंदोलन करू, असा इशारा मोईचे माजी सरपंच पाटीलबुवा गवारी यांनी या वेळी दिला.
एमआयडीसीलगत असलेली निघोजे ग्रामपंचायत व आम्ही आमच्या गावचा विकास करण्यासाठी सक्षम आहोत. चाकण नगरपरिषदेमध्ये समावेश होण्यास संपूर्ण गावाचा विरोध आहे. चाकण परिषद हद्दीतील रस्ते, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था यांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे आमच्यावर हा निर्णय लादू नये.
सुनीता येळवंडे, सरपंच, निघोजे.