पाळीव कुत्र्याने हल्ला केला ; मालकावर गुन्हा दाखल ! | पुढारी

पाळीव कुत्र्याने हल्ला केला ; मालकावर गुन्हा दाखल !

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील शाळकरी मुलगी मैत्रिणीबरोबर कराटे क्लासला जात असताना एका पाळीव कुत्र्याने हल्ला करत तिच्या दोन्ही पायांना चावा घेऊन तिला जखमी केले. या प्रकरणी कुत्रा पाळणार्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी जयराम लबडे (वय 13) असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तर युवराज काशिनाथ लबडे (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) यांच्यावर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी लबडे ही मंगळवारी (दि. 19) सकाळी 7 वाजता मैत्रिणीसह गावातील पांडुरंग मंदिरात कराटे क्लासला जात होती. युवराज लबडे यांच्या कुत्र्याने वैष्णवीच्या दोन्ही पायांना, पोटरीला चावा घेत तिला जखमी केले. या कुत्र्याने यापूर्वीही वैष्णवीची लहान बहीण व आजोबांवर हल्ला करीत चावा घेतला असल्याचे फिर्यादी रेणुका लबडे यांनी सांगितले. वारंवार सांगूनही युवराज लबडे यांनी कुत्रा मोकळा सोडून फिर्यादींस व त्यांच्या मुलीच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अविनाश कालेकर करीत आहेत.

गावात 40 ते 50 मोकाट कुत्री
जारकरवाडी गावात अंदाजे 40 ते 50 मोकाट कुत्री आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच आता पाळीव कुत्र्यांनींदेखील मुलीला चावा घेतला आहे. दरम्यान, गावातील भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मुलीला चावा घेत जखमी केल्याने कुत्रा मालक युवराज लबडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने कुत्र्याच्या हल्ल्यात इतर कोणी जखमी झाले असेल, तर पारगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
                                                             लहू थाटे, सहायक पोलिस निरीक्षक.

Back to top button