पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 30 जूनपर्यंत प्रसिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर न करण्यासाठी जबाबदार असणार्या अधिकार्यांवर कारवाई निश्चित करून, त्याचा अहवाल तत्काळ उच्च शिक्षण संचालनालयाकडे पाठवावा, असे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना दिले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यपालांनी कुलगुरूंची बैठक घेत त्यांना सत्र परीक्षांचे निकाल हे सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार किमान 30, तर कमाल 45 दिवसांत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यात पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. या तिन्ही विद्यापीठांचे निकाल येत्या 15 जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत. मात्र, पुणे विद्यापीठाचे निकाल येत्या 31 जुलैपर्यंत जाहीर होणार नसल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या अधिकार्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली आहे.
परराज्यात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी सत्र परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणे गरजेचे असते. प्रामुख्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राबविण्यात येणार्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होत आहे. एका विद्यापीठाचा निकाल रखडल्यास, त्याचा संपूर्ण परिणाम प्रामुख्याने सीईटी सेलच्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे.
हेही वाचा