कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन शिधापत्रिका प्रकिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारा, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना केली.
शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिधापत्रिका प्रकियेत असलेल्या त्रुटी, संभाव्य पूरस्थिती काळातील धान्य पुरवठा यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, महा-ई-सेवा केंद्रधारकांची बैठक झाली. चव्हाण यांनी कर्मचारीवर्ग कमी असल्याचे सांगितले. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून तत्काळ कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची सूचना केली.
सध्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रकिया सुरू आहेत. विद्यार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र आवश्यक असतात. दाखले, प्रमाणपत्र मागणीसाठी शिधापत्रिका आवश्यक आहे. शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन शिधापत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना केली आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहेत. जात, पोट जात या रकान्यामध्ये इतर जातींचा समावेश नसल्याने ऑनलाईन फॉर्म जमा होत नाहीत. यामुळे शैक्षणिक प्रवेशासह वैद्यकीय सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही. अनेक शिधापत्रिकांतील दुरुस्ती, नाव नोंदणी, नाव कमी करणे आदी कामे प्रलंबित आहेत. ऑनलाईन शिधापत्रिका प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून नागरिकांना तत्काळ शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, असे क्षीरसागर यांनी चव्हाण यांना सांगितले. यावेळी अन्न धान्य वितरण अधिकारी प्रज्ञा कांबळे, बाबासाहेब कणसे, निशिकांत माने, सुनील जाधव, धनंजय पाटील, पूजा भोसले, इर्शाद मुल्ला आदी उपस्थित होते.