येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नागपूर चाळ गल्ली क्रमांक एक ते चार, तसेच एअरपोर्ट रस्त्यावरील पोस्ट ऑफिस चौक ते जेल रोड पोलिस चौकीपर्यंत येरवडा कारागृहाच्या सीमा भिंतीलगत 'नो पार्किंग झोन' करण्याचा निर्णय येरवडा वाहतूक विभागाने घेतला होता.
नागपूर चाळ व महाराष्ट्र हाउसिंग बोर्डमधील रहिवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा असल्याने तो निर्णय रद्द करावा, अशी मागणी नागपूर चाळ रहिवासी संघाने केली होती.
त्यानुसार हा निर्णय मागे घेण्याला वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मगर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक आयुब शेख, नागपूर चाळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चौरे, सरचिटणीस शाम गुप्ता, ताराचंद जैन, राजू बाफना, यशवंत शिर्के, पथारी संघटना अध्यक्ष विजय कांबळे, अण्णा मोहिते आदींसह नागरिक या वेळी उपस्थित होते. डॉ. धेंडे यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा केला. नागपूर चाळ रहिवाशांसाठी पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी 3 हजार 200 कुटुंबे राहत आहेत. तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये सुमारे चार हजार कुटुंबे राहात आहेत.
परिसरात रस्त्याच्या दुतर्फा 142 प्रकारची दुकाने आहेत. तीन रुग्णालये, चार मेडिकल दुकाने, तसेच दोन अधिकृत रिक्षा थांबे आहेत. या सर्वांची पार्किंगची व्यवस्था सध्या रस्त्यालगत आहे. या ठिकाणी 'नो पार्किंग झोन' झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार होती. यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी मगर यांच्याकडे केली होती. यानुसार या निर्णयाला स्थगिती देत असल्याचे मगर यांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसेच जी 20 परिषद व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्यांप्रसंगी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेने केले असून, रहिवाशांनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.
हेही वाचा