हडसन व्हॅली : अंतराळाप्रमाणेच समुद्रातील जीवनही इतके रहस्यमय आहे की, त्यात केव्हा काय मिळेल, हे काहीही सांगता येत नाही. काही वेळा यात अशी काही वस्तू मिळते, ज्यामुळे रातोरात नशीब बदलून जाते, तर काही वेळा असेही काही मिळते, ज्यामुळे क्षणभर सुन्न होऊन जाते. असेच काहीसे एरिक ऑसिन्स्की या मच्छीमाराबाबत घडले. हा मच्छीमार हडसन व्हॅलीत मच्छीमारीसाठी गेला होता. यावेळी त्याच्या जाळ्यात अन्य माशांबरोबरच सायन्स फिक्शनमधील एखाद्या कॅरॅक्टरप्रमाणे असणारा एक जीव सापडला. सक्शन कपच्या आकाराचा हा जीव पाहून अनेकांचे डोळे चक्रावले.
'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा जीव ईलप्रमाणे जरूर होता; पण त्याच्या तोंडात दातांची रांगच होती. कॅटस्किल आऊटडोअर्स या फेसबुक ग्रुपने याची काही छायाचित्रे पोस्ट केली असून, यात मच्छीमारी करत असताना मला हे सापडले, असे त्यात म्हटले आहे.
हे छायाचित्र पोस्ट करताच यूजर्सची टिपणी सुरू झाली. चित्रपटातील एलियनसारखा हा जीव असल्याचे एका यूजरने यावेळी म्हटले. 2 फूट लांबीचा हा जीव पॅरासाईट असून, त्याला वॅम्पायर फिश या नावानेदेखील ओळखले जाते. त्याचे तोंड सक्शन कपसारखे असते आणि याच जोरावर तो सावज टिपतो. त्याच्या तोंडात असे फ्लूएड असते, जे सावजाचे रक्त पातळ करते आणि नंतर ते पिऊन टाकते. या घातक सवयीमुळे त्याचे सावज केवळ रक्त कमी झाल्याने गतप्राण होते.