

Supriya Sule on Deputy CM Sunetra Pawar
पुणे : "तो माझा मोठा भाऊ होता. माझ्यात आणि अजितदादामध्ये काय चर्चा झाली ते त्याला माहिती होते. आमच्यात बोलणं झालं होतं ते आमच्यात आहे, ते वास्तव आहे. दादा आज नाही. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंद आहे; पण दादा नाही हे दुःख कायम राहील. दादा गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कुटुंब अडचणींच्या काळातून चालले आहे," अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली.
कुटुंब अडचणींच्या काळातून चालले आहे. आम्ही यातून सावरत आहोत. आमची सगळी चर्चा दादांसोबत झाली होती. आज दादा नाहीत. त्यामुळे त्या चर्चेवर आता बोलून मला कोणाची उणिधुणी काढायची नाहीत. माझं माझ्या भावाशी बोलणं झालं होतं. ते आमच्यात आहे. माझ्याकडे पूर्व विदर्भातील कोणत्या नेत्याच्या फाइलबद्दल माहिती नाही. माहिती मिळाल्यास कळवेन, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालच (बुधवारी) बोलले आहेत. ते सविस्तर तपास करतील. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. रोहित पवार अस्वस्थ आहेत, हे साहजिक आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. रोहितच्या मनात अनेक प्रश्न आहेत, असेही त्यांनी सांगितले. रोहित पवार यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे मी अमित शाह यांना ई-मेल पाठवून भेटण्यास विनंती केली होती. पण आज रोहित मुंबईला गेला आहे. तो परत आल्यावर मी अमित शाहांना विनंती करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवार साहेबांची प्रकृती चांगली आहे. सर्वांच्या प्रेमामुळे आणि रुबी हॉलच्या सर्वांमुळे तब्येत उत्तम आहे. पाच दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानंतर ते बाहेर येतील. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे फोन आले होते. त्यांचे आभार.
रेवती आणि सारंग वर्षभर एकमेकांना ओळखतात. मला सहा भाऊ आहेत; त्यांनी या नात्याला आशीर्वाद दिला. दादा असताना हे लग्न ठरलं होतं. दादा असता तर रेवतीच्या लग्नाची घोषणा दादांनी केली असती. अनाउन्समेंट ३० तारखेला होणार होती; परंतु दादा गेल्यामुळे केली नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक संसदेचं अधिवेशन सुरू असताना घेऊ नये. जलजीवन मिशनचे अनेक प्रश्न होते. पुण्यात अनेक उपक्रम सुरू आहेत. विविध विकासकामांसाठी अजितदादांनी काही कोटी रुपये दिले होते. ते काम पुढे व्हावं. घाई झाली वगैरे लोक बोलत असतात. दादांची जबाबदारी आणि त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत, एवढीच इच्छा आहे. संसदेत निलंबन होणं, टीका होणं हे स्वाभाविक आहे. मतभेद असावेत; मात्र मनभेद असू नयेत.