अनेक उत्कृष्ट कलाकृती ’राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात

चित्रपटांचा अमूल्य ठेवा प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त करताना सुनील सुकथनकर आणि चिन्मय दामले.
चित्रपटांचा अमूल्य ठेवा प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त करताना सुनील सुकथनकर आणि चिन्मय दामले.
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी एकत्रितपणे निर्मिती केलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकृतींची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे. यामध्ये भावे यांच्या 'बाई' या पहिल्या लघुपटापासून ते 'पाणी', 'मुक्ती', 'दोघी', 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई' अशा 35 एमएमसह 'किशन का उडन खटोला' या दिग्दर्शक विजया मुळ्ये यांच्या 16 एमएम चित्रपटाचाही समावेश आहे.

दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि चिन्मय दामले यांनी हा ठेवा एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त केला. डिजीबेटा, बेटाकॅम, उमँटिक, डीएलटी टेप्स, डीव्ही, मिनीडीव्ही आणि व्हीएचएस फॉर्मंट्समधील चित्रपटांच्या कँसेट हा या संग्रहामधील प्रमुख भाग आहे. उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जीवनावर आधारित 'कर्ता' लघुपटाच्या विविध सहा व्हर्जनही समाविष्ट आहेत. याशिवाय 'जिंदगी जिंदाबाद', 'एक कपच्या', 'मोर देखने जंगल में' आदी चित्रपटांचा त्यात समावेश आहे. विविध लघुपटांसह 'पार्टिंग विथ प्राइड', 'पिलग्रिम्स ऑफ लाइट' या माहितीपटांसह 'कथा सरिता', 'अखेरची रात्र' आणि 'भैस बराबर' अशा भाषा शिक्षणावरील लघुपटांच्या मालिकेचाही समावेश आहे.

'गतवर्षी यासंदर्भात सुमित्रा भावे यांच्याशी बोलणे झाले होते. पण त्यांचे निधन झाले. समाजातील विविध विषयांचा वेध घेणारी त्यांची फिल्मोग्राफी हे एक सामाजिक दस्तावेजीकरण आहे. या मूल्यवान ठेव्याचा विद्यार्थी, संशोधक आणि नवोदित दिग्दर्शकांना नक्कीच उपयोग होईल, ' असे प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

एनएफएआय आमच्या चित्रपटनिर्मितीच्या प्रवासातील एक भाग आहे. इथे आमच्या कलाकृती योग्य पद्धतीने जतन केल्या जातील, याचा आनंद आहे. हे साहित्य डिजिटायझेशन केले जाईल.

                                                                            – सुनील सुकथनकर, दिग्दर्शक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news