व्लादीमीर पुतीन यांची तब्बल ७२९ कोटी रुपयांची आलिशान नौका हॅकर्सच्या निशाण्यावर ! | पुढारी

व्लादीमीर पुतीन यांची तब्बल ७२९ कोटी रुपयांची आलिशान नौका हॅकर्सच्या निशाण्यावर !

मॉस्को; पुढारी ऑनलाईन : रशियाच्या युक्रेनवर आक्रमण करण्याच्या निर्णयामुळे आणि या युद्धामुळे सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा जगभर चर्चेत आहेत. रशियाचा अतिशय शक्तिशाली नेता मानल्या जाणार्‍या पुतीन यांची संपत्तीही अफाट असल्याचे म्हटले जाते. रशियातील त्यांचे विरोधक याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी आरोप व टीका करीत असतात.

काळ्या समुद्रालगत गेलेंदझिक येथे त्यांचा अतिशय आलिशान महाल असल्याचेही सांगितले जाते. हा महाल तब्बल 956.8 दशलक्ष डॉलर्सचा (72 अब्ज रुपयांपेक्षा अधिक!) आहे. त्यांची खासगी नौकाच 729 कोटी रुपयांची असून, आता हॅकर्सनी तिचे नाव बदलल्याने ही नौकाही चर्चेत आली आहे!

युक्रेनवर हल्ला करून जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यापाशी आणून सोडल्याने जगभरातून पुतीन यांच्यावर सध्या टीकेची झोड उठत आहे. त्यांनी अनेक लोक ‘पुतीन’ ऐवजी ‘पुतलर’ असे म्हणून हिटलरच्या तोडीचा ठरवत आहेत. हॅकर्सच्या एका समूहाने आता त्यांच्या या आलिशान नौकेचे ‘ग्रेसफुल’ हे नाव बदलून तिचे ‘अश्लील’ असे नामकरण केले आहे. शिवाय या नौकेचे ठिकाण ‘नरक’ असे म्हटले आहे.

हॅकर्सच्या या ‘अ‍ॅनॉनिमस’ असेच नाव असलेल्या समूहाने पुतीन सरकारविरुद्ध आपण सायबर युद्धच पुकारले असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी रशियाच्या ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमचा अ‍ॅक्सेस मिळवून पुतीन यांच्या 729 कोटी रुपयांच्या नौकेचे नवे बारसे केले! रायन गॅलॉघर नावाच्या ट्विटर युजरने याबाबतची माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, रशियाच्या सागरी वाहतुकीची माहिती मिळवून या हॅकर्सनी पुतीन यांची ही लक्झरी यॉट युक्रेनच्या स्नेक आयलँडवर धडकली असल्याचे दाखवले आणि तिचा सध्याचा ठावठिकाणा थेट नरकात दाखवला! ‘अ‍ॅनॉनिमस’ने रशियातील अनेक वेबसाईट्स आणि सरकारी माध्यमांना लक्ष्य बनवले आहे. आताही हे प्रँक आपण काही लोकांच्या चेहर्‍यावर हास्य आणण्यासाठी केले असल्याचे समूहाने म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button