

Sunetra Pawar NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत या चर्चांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. विलिनीकरणाबाबत विचारले असता, 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील,' असे एका वाक्यात उत्तर देत त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी या विषयावर सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील 20 ते 22 आमदार लवकरच पक्ष सोडू शकतात, असे राऊत म्हणाले.
'सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडू शकतात. हे आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. शरद पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही भेट केवळ गप्पा मारण्यासाठी नाही,' असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा मुद्दाही उपस्थित केला. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची परिस्थिती बदलली आहे. पक्षातील आमदारांना सध्या स्वाभिमान गहाण ठेवून काम करावे लागत असल्याचे राऊत म्हणाले.
अशा परिस्थितीत हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली येऊ शकतात. मात्र, या प्रक्रियेला विलिनीकरण म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही आमदार निवडणुकीपूर्वी एक-दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यताही राऊत यांनी व्यक्त केली.
एकीकडे सुनेत्रा पवार यांनी विलिनीकरणाच्या प्रश्नावर थेट भूमिका मांडणे टाळले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील,' असे सांगत या विषयावर सध्या पडदा ठेवला आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.