

मुंबई: भाजपची साथ सोडून अजित पवार यांचा पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी लढायला तयार असेल, तर विलीनीकरणाला आमचा विरोध नसेल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नाव अजित पवार यांच्या विमान अपघाताशी काही लोकांनी जोडल्याचे ऐकले आहे. मात्र, केवळ नावे घेण्यापेक्षा संबंधितांकडे पुरावे असतील तर ते समोर आणावेत, असे आवाहन रोहीत यांनी केले.
सतेज पाटील यांच्या पॅनेलला जनतेचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, भाजप आणि मित्रपक्षांनी चार अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार देऊन रडीचा डाव खेळला आहे, असेही ते म्हणाले.
गोकुळच्या मोर्चात हसन मुश्रीफ यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र या निर्णयामागील प्रमुख जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोलत नसल्याची टीकाही त्यांनी केली.