Ujani Crime Activities: उजनीत पुन्हा गुन्हेगारीच्या हालचाली? वाळू आणि मत्स्यव्यवसायावर वर्चस्व मिळवण्याच्या चर्चेने चिंता

वाळूच्या व्यवहारातून पूर्वी झाले होते रक्तरंजित संघर्ष; सामाजिक संघटना आणि राजकीय संपर्कांच्या आडून गुन्हेगारी सक्रिय होत असल्याची चर्चा, पोलिसांसमोर सतर्कतेचे आव्हान
Ujani dam
Ujani damPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

भरत मल्लाव

भिगवण: कोट्यवधी रुपयांचे काळे सोने (वाळू) आणि मत्स्यव्यवसायावर आपले साम्राज्य उभे करण्यासाठी उजनी परिसरात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. रक्तरंजित घटनांनंतर गुन्हेगारांना चाप बसल्याने थंडावलेली उजनी आता पुन्हा गुन्हेगारांच्या केंद्रस्थानी आली आहे. उजनीच्या प्रमुख गावांत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वर्दळ वाढली आहे. झटपट पैशांच्या आमिषाने अल्पवयीन मुले आणि तरुणांना हेरून नामचीन गुन्हेगार त्यांच्या टोळ्या सक्रिय करत आहेत. सामाजिक व राजकीय कार्यक्रमांत अशा गुन्हेगारांची ऊठबस वाढली असून, काही जण पोलिसांशीही मैत्रिपूर्ण संबंधांत वावरताना दिसत असल्याने सामान्य नागरिक अचंबित झाले आहेत.

Ujani dam
Pune Water Cut: पुणेकरांवर २० टक्के पाणीकपातीचे संकट? आज कालवा समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

वाळूवरून रक्तरंजित इतिहास

पूर्वी उजनीतील वाळूवरून दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा व माढा तालुक्यांत गँगवार भडकले होते. गावठी पिस्तुलांतून होणारे गोळीबार आणि सत्तूर, तलवारी, चाकू, कोयते यांच्या खुलेआम प्रदर्शनाने उजनीची वाळू रक्ताळली होती. अनेकांचे बळी गेल्यानंतर सरकार, पोलीस व महसूल विभागाने कारवाई करून गुन्हेगारांना वठणीवर आणले, तेव्हा कुठे उजनी शांत झाली.

Ujani dam
Velhe Mulshi Conservation Reserve: वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी; सह्याद्रीच्या जैवविविधतेला मिळणार संरक्षण

राणा सूर्यवंशी हल्ल्यानंतर उजनी चर्चेत

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणानंतर उजनी पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून काही तरी शिजत असल्याची चर्चा आहे. उजनीकडे पाठ फिरवलेले जुने-नवे गुन्हेगार पुन्हा सक्रिय होत आहेत. संघटना आणि सामाजिक कामाच्या आडून गुन्हेगारीला बळकटी देण्याची सुरू झालेली पेरणी धोक्याची घंटा ठरत आहे.

Ujani dam
Pune Robbery Case: पुण्यात भरदिवसा ३० लाखांची लूट; दरोड्याऐवजी ‘प्रॉपर्टी मिसिंग’ची नोंद!

वाळू आणि मासेमारी लक्ष्यावर

कायदेशीर व बेकायदेशीर वाळूउपशात मोठा खंड पडल्याने हजारो कोटींच्या वाळूवर डल्ला मारण्यासाठी गुन्हेगारी वर्तुळातील मंडळी उजनीभोवती घिरट्या घालू लागली आहेत. दुसरीकडे, मासेमारी व्यवसायातील लाखोंची उलाढालही त्यांच्या नजरेत भरली आहे. त्यामुळे दोन्ही व्यवसायांवर कब्जा मिळवण्यासाठी गुन्हेगारांची बांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.

या बांधणीत केवळ गुन्हेगारच नव्हे, तर सामाजिक संघटनांच्या नावाखाली काही पांढरपेशी व्यक्तीही सहभागी असल्याचे बोलले जाते. मच्छिमारांबद्दल कळवळा असल्याचे दाखवत शिरलेल्या काहींचा गरीब व भोळ्याभाबड्या मच्छिमारांच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन या व्यवसायात पाय रोवण्याचा छुपा अजेंडा असल्याची चर्चा मच्छिमारांत आहे. वाळूउपशातून ठप्प झालेली कोट्यवधींची उलाढाल गुन्हेगारांना अस्वस्थ करत असून, त्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत डाव रचले जात असल्याचीही चर्चा आहे.

Ujani dam
Pune Cyber Blackmail Case: पुण्यात सायबर ब्लॅकमेलिंगमुळे तरुण इंजिनिअरने जीवन संपविले; बिहारमधून दोघांना अटक

पोलिसांपुढे आव्हान

पोलिसांनी वेळीच गांभीर्याने लक्ष न दिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडण्यास वेळ लागणार नाही. गुन्हेगारांच्या वाढत्या वर्दळीची धोक्याची घंटा ओळखली नाही, तर उजनीत पुन्हा तांडव घडून रक्तपात होण्याची भीती आहे. पोलिसांनी संभाव्य धोके ओळखून वेळीच जरब बसवण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्हेगारीचा ट्रेंड बदलतोय

समाजसेवक, संघटना किंवा राजकीय आश्रयाचा बुरखा पांघरून गुन्हेगारी विश्व उभे करण्याचा नवा ट्रेंड पुढे येत आहे. संघटना किंवा सामाजिक कामाचा दिखावा करायचा आणि भविष्यात त्याचे रूपांतर आपल्या काळ्या साम्राज्यात करायचे, हे मनसुबे पोलिसांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

logo
Pudhari News
pudhari.news