

वेल्हे: सिंहगड पायथ्याच्या डोणजे, गोऱ्हे तसेच खानापूर, मणेरवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन दिवसांत डोणजे परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 20 हून अधिक जखमी झाले, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोणजे परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. 22) व मंगळवारी (दि. 23) अशा दोन दिवसांत 20 जण जखमी झाले. येथे तीन दिवसांपासून या कुत्र्याने शालेय विद्यार्थी, पदचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, ग््राामपंचायत कर्मचारी आदींवर कुत्र्याने अचानक हल्ला करून त्यांच्या हातापायाचे, पोट, मानेचे लचके तोडले आहेत.
डोणजे येथील महादेव पाटील (वय 68), चंद्रकांत सदाशिव पारगे (वय 70), दिग्विजय जाधव (वय 15) तसेच खानापूर येथील अपर्णा जाधव (वय 25), मोहन वाघ (वय 40) आदी नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
प्रशासन सुस्त; नागरिक त्रस्त
दाट लोकवस्त्यांच्या सिंहगड रोड, डोणजे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. अंगणात खेळणाऱ्या लहान मुले, शालेय विद्यार्थी, पादचाऱ्यांवर कुत्र्यांच्या झुंडी अचानक हल्ला करीत आहेत. सिंहगड परिसरातही मोकाट कुत्र्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात दररोज आठ ते दहा जण गंभीर जखमी होत आहेत. दुसरीकडे प्रशासन सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
डोणजे व परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्य केंद्रात त्यांना प्राथमिक प्रतिबंधक लस देण्यात आली. सर्व रुग्णांचे हातापायाचे तसेच शरीराच्या इतर भागांचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले आहेत. गंभीर जखमा असल्याने त्यांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले आहे.
डॉ. वर्षाराणी मुंडासे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खानापूर