

महेंद्र कांबळे
पुणे: राग, भीती आणि गोंधळ… या भावनांच्या भोवऱ्यात अडकलेले एक बालपण आणि रस्त्यावर भरकटलेली एक मनोरुग्ण महिला मात्र वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि माणुसकीच्या स्पर्शामुळे दोघींचेही आयुष्य सुरक्षित मार्गावर परतले. कोथरूड परिसरात दामिनी पथकाने केलेल्या या दोन कारवाया केवळ पोलिसी कामगिरी न राहता, समाजासाठी आश्वासक ठरल्या आहेत.
दिनांक २१ डिसेंबर रोजी मोरे विद्यालय चौक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना एका रिक्षाचालकाने दामिनी पथकाला थांबवत, “मॅडम, एक लहान मुलगी फार घाबरलेली आहे,” अशी माहिती दिली. तात्काळ दामिनी कोथरूड मार्शल श्रुती कढणे आणि आरती जाधव यांनी त्या मुलीशी संवाद साधला. सुरुवातीला ती काहीच बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मात्र संयम, प्रेमळ शब्द आणि विश्वासामुळे तिची कहाणी हळूहळू उलगडत गेली.
ही मुलगी पिंपरी-चिंचवड येथील हॉस्टेलमध्ये गेली आठ वर्षे राहत असून इयत्ता आठवीत शिकत होती. हॉस्टेलमध्ये झालेल्या एका किरकोळ वादानंतर रागाच्या भरात तिने कोणालाही न सांगता हॉस्टेल सोडले आणि कोथरूडला येणाऱ्या बसने प्रवास केला. मात्र अनेक वर्षांनंतर परिसर ओळखीचा वाटेना, पैसेही नसल्याने ती पूर्णपणे गोंधळून गेली.
दामिनी पथकाने तिला कोथरूड पोलीस ठाण्यात आणून महिला पोलीस उपनिरीक्षकांच्या मदतीने चौकशी केली. नातेवाईकांचा शोध, हॉस्टेल प्रशासनाशी संपर्क साधत अखेर दुपारी मुलीला सुरक्षितपणे हॉस्टेलच्या ताब्यात देण्यात आले. त्याआधी मुलीला समज देत, बाहेर पडण्यापूर्वी माहिती देणे, वाढते गुन्हेगारी धोके आणि स्वतःची सुरक्षितता याबाबत सविस्तर काउन्सेलिंग करण्यात आले.
दरम्यान, याच आठवड्यात कोथरूड परिसरात रस्त्यावर स्वतःला इजा करून घेत असलेल्या एका मनोरुग्ण महिलेस दामिनी पथकाने ताब्यात घेतले. संवादातून माहिती न मिळाल्याने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत, तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यात आले. उपचार सुरू असलेल्या या महिलेस तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले. अनेक तासांच्या चिंतेनंतर मुलगी सुखरूप परतल्याने नातेवाईकांनी दामिनी पथकाचे आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले. या दोन्ही कारवाया कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. कायद्याच्या चौकटीत राहून माणुसकी जपणारे हे काम “पोलीस म्हणजे आधार” ही भावना दोन्ही घटनांमध्ये व्यक्त करण्यात आली.
अनेक वेळा मुलं किंवा महिला राग, भीती किंवा तणावामुळे चुकीचे निर्णय घेतात. अशावेळी त्यांना ओरडण्यापेक्षा विश्वास देणं महत्त्वाचं असते. आम्ही आधी ऐकतो, मग समजावतो. प्रत्येक मुली सुरक्षित राहणे हीच आमची खरी जबाबदारी आहे.
श्रृती कढने, दामिनी मार्शल, कोथरूड