

इंदापूर: इंदापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा, विजयी 14 नगरसेवक तसेच पराभूत उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग््रेासचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुणे येथे सोमवारी (दि. 22) भेट घेतली.
या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. अजित पवार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
इंदापूर शहराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडत अजित पवार यांनी नगरसेवक, पदाधिकारी व प्रशासनाला विश्वासात घेऊन समन्वयाने काम करण्याचे तसेच इंदापूरचा विकास आदर्श शहर म्हणून करण्याचे आवाहन केले.
अजित पवार यांनी पराभूत उमेदवारांनी निराश न होता नव्या जोमाने जनतेसाठी काम करावे. लोकशाही प्रक्रियेत जय-पराजय स्वाभाविक असतो; मात्र जनतेच्या अपेक्षांची पूर्तता हीच खरी कसोटी आहे, असे स्पष्ट केले.
या प्रसंगी मंत्री भरणे यांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक प्रभागात दर्जेदार विकासकामे, मूलभूत सुविधा आणि गोरगरीब जनतेच्या अडचणी वेगाने सोडविण्याचे काम नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा व सर्व नगरसेवक करतील, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादी काँग््रेासचे इंदापूर तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.