वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावला; एमआयएम उमेदवार अनिस सुंडकेंचा आरोप

वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावला; एमआयएम उमेदवार अनिस सुंडकेंचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता पुणे लोकसभा मतदारसंघातील एका राजकीय व्यक्तीने अधिकार्‍यांशी संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी रूहिनाज शेख, शाहिद शेख, सामाजिक कार्यकर्ते रिहान शेख, मुबीन खान उपस्थित होते. अनिस सुंडके म्हणाले, रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्यानजीक 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्याचा भंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली.

बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्या वर्षीच्या (2023) मार्च-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड लाटण्यात आला आहे. पहिल्यांदा 18 मार्च 2023 या दिवशी वक्फ बोर्डाच्या या वादग्रस्त भूखंडावर बोजा नोंद करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणार्‍या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तिमान अल्लाची देन असते.

गरीब, मागास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र, पुण्यासारख्या ठिकाणी वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बळकावला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमत्ता परत केली पाहिजे, अशी मागणी सुंडके यांनी केली. तसेच, संबंधित प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. तत्पूर्वी राज्य शासनाने वक्फ बोर्डाची जागा बळकावून तिथे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामास न्यायालयीन कार्यवाही पूर्ण होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणीही सुंडके यांनी शासनाकडे केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news